होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहिदांच्या वारसांना ५ एकर जमीन देणार

शहिदांच्या वारसांना ५ एकर जमीन देणार

Published On: May 14 2018 1:53AM | Last Updated: May 14 2018 1:23AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

नक्षलवादी व अतिरेकी कारवाया, शत्रुराष्ट्राच्या सैन्याविरोधात लढताना शहीद झालेल्या सैनिकांच्या वारसांना पाच एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. महसुल विभागाने यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली असून याबाबतच्या निर्णयावर येत्या आठवडाभरात शिक्कामोतर्ब होण्याची शक्यता आहे. 

गडचिरोलीसारख्या आदिवासी नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करताना वीरमरण आलेल्या पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनाही या कक्षेत सामावले जाणार असल्याची माहिती महसुल विभागातील अधिकार्‍याने दिली. याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर लवकरच शासन निर्णय काढण्यात येणार असल्याची माहिती या अधिकार्‍याने दिली.

नक्षलविरोधी कारवाया तसेच सीमेवर बंदोबस्तासाठी असलेल्या जवानांवर अतिरेक्यांकडून झालेल्या गोळीबारात शहिद होण्याच्या प्रमाणात गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील अनेक जवानांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागते. अत्यंत कमी वयात आपल्या प्राणांना मुकावे लागलेल्या या जवानांच्या कुटूंबियांवर दुखाःचा डोंगर कोसळतो. घरामध्ये कमवते दुसरे कोणीही नसल्यामुळे शहीदांच्या कुटुबियांची उपासमार होते. अशा कुटूंबांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून यापुढे 5 एकर जमीन देण्याबाबत महसुल विभाग विचार करत होता. केंद्राकडुन शहीदांच्या वारसाना मदतीपोटी रोख रक्कम दिली जात असली तरी ती काही दिवसानी संपते. त्यामुळे कायमस्वरुपी मदत म्हणुन महसुल विभागाने पाच एकर जमीन शहिदाच्या पत्नीला देण्याचा विचार केला आहे. शहिद जर अविवाहित असेल तर त्याच्या आई वडिलांनाही वारस म्हणून जमीन दिली जाणार आहे.