Mon, Apr 22, 2019 16:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रियकराची हत्या करून प्रेयसीवर बलात्कार करणारा माथेफिरू जेरबंद

धक्कादायक; बघून हसल्यामुळे प्रेयसीवर बलात्कार!

Published On: Mar 12 2018 1:40AM | Last Updated: Mar 12 2018 1:40AMडोंबिवली : वार्ताहर

अंबरनाथ-टिटवाळा शहरांच्या वेशीवर असलेल्या नालिंबीच्या डोंगरात 6 दिवसांपूर्वी प्रियकराची गोळ्या झाडून हत्या करून प्रेयसीवर जबरी बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला शोधून काढण्यास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. संजय नरवडे (26) असे या खुनशी, आडदांड आणि हिंसक प्रवृत्तीच्या चतुर्भुज करण्यात आलेल्या माथेफिरूचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 दिवसांपूर्वी अंबरनाथ टिटवाळा हद्दीतील नालिंबी भागातील डोंगरावर रात्रीच्या सुमारास प्रेयसीसोबत बसलेल्या गणेश दिनकर या तरूणाची चार गोळ्या झाडून हत्या करुन त्याच्या प्रेयसीवर जबरी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यानंतर फरार झालेल्या माथेफिरूबाबत पोलिस पूर्णतः अनभिज्ञ होते. या गुन्ह्यातील आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी पीडित तरूणीने केलेल्या वर्णनावरून आरोपीचे स्केच जारी केले होते. यातील मुख्य आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची 3 पथके तैनात करण्यात होती. पोलिसांनी या भागातील हिस्ट्रीशिटर आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांची माहिती काढली. त्यातील काहींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. अत्यंत किचकट असलेला हा गुन्हा उघडकीस आणणे हे पोलिसांपुढे कडवे आव्हान होते. 3 पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्रं-दिवस माथेफिरूच्या मागावर होते. शोध सुरू असतानाच पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत आरोपीची माहिती काढली. खबरीने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प नं. 5 येथून एका संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी संजय नरवडे यानेच हा भयंकर प्रकार केल्याचे उघड झाले.

आरोपी संजय नरवडे हा पूर्वी रिक्षा चालवायचा. तो मुळ जालना येथील राहणारा आहे. घटनेदिवशी संजय हा नालिंबी परिसरातील 3 झाडी जवळील कठड्यावर बसला होता. सायंकाळच्या सुमारास गणेश दिनकर हा त्याच्या प्रेयसीला बुलेटवरून घेऊन जाताना तो आरोपी संजयकडे पाहून हसला होता. त्यामुळे संजयला त्याचा राग आला. बुलेटवरून जाणारा अनोळखी तरूण आपल्याकडे बघून का हसला, याचा जाब विचारण्यासाठी संजय त्या रस्त्याने गणेशच्या मागे गेला. गणेश हा प्रेयसीला घेऊन नालिंबी डोंगराजवळील झुडपाच्या ठिकाणी बसला होता. संजय तेथे गेला. त्याने गणेशला मला बघून का हसलास, असे विचारत त्याच्याशी भांडण सुरू केले. दोघांमध्ये झटापट झाल्यावर आरोपी संजयने जवळील रिव्हॉलवर काढून 2 गोळ्या हवेत झाडल्यावर त्याच्याकडे बुलेटची चावी मागीतली. ती देण्यास गणेशने नकार दिल्याने संजयने 4 गोळ्या गणेशवर झाडल्या. यात गणेश हा रक्ताच्या थारोळ्यात जागीच तडफडून ठार झाला. हा प्रकार गणेशच्या प्रेयसीने पाहिल्यावर तिने संजयला बडबड करण्यास सुरूवात केली. तिचाही राग आल्याने त्याने तिला त्या ठिकाणापासून दाट झाडीत ओढत नेले. तेथे तिच्यावर जबरी बलात्कार केला. त्या ठिकाणाहून पळून जाताना त्याने पीडित तरूणीच्या जवळील रोख रक्कम व सिम कार्ड काढून मोबाईल फोन चोरी करून घेऊन गेला. हा सर्व घटनाक्रम तपासादरम्यान उघडकीस आला.