Mon, Dec 17, 2018 16:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदिवलीतील तरुणींचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

कांदिवलीतील तरुणींचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 12:53AMमुंबई : प्रतिनिधी

कांदिवलीमध्ये राहात असलेल्या दोन कॉलेज तरुणींचे इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट अकाऊंट अज्ञाताने हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कांदिवली पोलीस तपास करत आहेत. विशेष म्हणजे या तरुणींकडे त्यांचे खासगी फोटो मागण्यात आल्याने त्या मुलींना संशय आला व त्यांनी फोटो देण्यास नकार देऊन पोलीस ठाणे गाठले. 

कांदिवली पश्‍चिमेकडील इराणीवाडी परिसरात कुटुंबासोबत राहत असलेली 19 वर्षीय तरुणी अंधेरीतील एका नामांकित महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेते. ही तरुणी घरी असताना तिच्या एका जीवलग मैत्रिणीच्या इन्स्टाग्राम आयडीवरून स्नॅपचॅटचा एक मॅसेज आला. तरुणीने हा मेसेज ओपन केला असता त्यात आयडी आणि पासर्वडची मागणी करण्यात आली. मैत्रिणीच्या अकाऊंटवरून मॅसेज आल्याने तरुणीने आयडी आणि पासवर्ड शेअर केला. त्यानंतर स्नॅपचॅटचे अकाऊंट ऑपरेट होत नसल्याचे तिच्या लक्षात आले. काही वेळाने मैत्रिणीच्या याच अकाऊंटवरून पुन्हा एक मॅसेज आला. त्यात या तरुणीकडे खासगी फोटोंची मागणी करण्यात आली.

तरुणीला संशय आल्याने तिने या मैत्रिणीला फोन केला. तिनेही आपले इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले असून अ‍ॅक्सेस करता येत नसल्याचे सांगितले. अखेर दोघींचेही अकाऊंट हॅक झाल्याची खात्री पटल्याने या तरुणीने कांदिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.