Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खडसेंच्या धाडीने गिरीश बापट अडचणीत

खडसेंच्या धाडीने गिरीश बापट अडचणीत

Published On: Jan 21 2018 2:49AM | Last Updated: Jan 21 2018 1:29AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मंत्रिमंडळ प्रवेश अनिश्‍चित बनल्याने पक्षावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे हे आता पक्षाविरोधात अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी भुसावळ येथील शासकीय गोदामावर धाड घालून तेथील धान्य घोटाळा उघडकीस आणला. या घोटाळ्याला केवळ अधिकारी जबाबदार नसून बडे राजकीय नेतेही जबाबदार असल्याचा आरोप खडसे यांनी केल्याने अन्‍न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट अडचणीत आले आहेत. खडसेंच्या आरोपानंतर बापट यांनी मुंबईहून भरारी पथक जळगावला रवाना केले. 

एकनाथ खडसे यांनी घातलेल्या धाडीत प्रत्येक पन्नास किलोच्या गोणीतील 10 ते 12 किलो धान्य चोरी होत असल्याचे समोर आले आहे. या धान्य घोटाळ्यात सत्ताधारी तसेच अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला. त्यांची नावेही मध्यंतरी माध्यमांमध्ये छापून आली होती, असा टोलाही खडसे यांनी लगावला. 

खडसे यांच्या धाडीनंतर चौकशी करण्यासाठी गिरीष बापट यांनी मुंबईहून भरारी पथक जळगावला रवाना केले. हे पथक गोडाऊन सील करून कागदपत्रांची तपासणी करणार आहे. या प्रकरणाची तीन दिवसात विभागाअंतर्गत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले आहे.