Fri, Aug 23, 2019 21:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणेकरांना नव्या वर्षात थीम पार्कचे गिफ्ट

ठाणेकरांना नव्या वर्षात थीम पार्कचे गिफ्ट

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 1:09AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रवीण सोनावणे  

नवीन वर्षांमध्ये ठाणेकरांना शहराच्या विविध भागामध्ये तब्बल सात मनोरंजनाची ठिकाणे उपलब्ध होणार आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या सात थीम पार्कची कामे अंतिम टप्पयात आली असून सहा थीम पार्क मार्च 2018 पर्यंत तर एक थीम पार्क मे पर्यंत ठाणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे. या सात थीम पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थीम असल्याने ठाणेकरांना वेगवेगळ्या विषयांचा आस्वाद मिळणार आहे. याशिवाय शहराचे ग्रीन कव्हर देखील वाढणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. 42. 53 कोटी रुपये खर्च करून या सर्व थीम पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. 

शहरातील अस्तित्वात असलेल्या उद्यानाची अवस्था अतिशय खराब असून पालिका प्रशासनाकडून देखील या उद्यानांची फारशी देखभाल दुरुस्तीची कामे होत नाहीत. त्यामुळे शहरात 21 थीम पार्कचे नियोजन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये बॉलिवूड पार्क, नव्या आणि जुन्या ठाण्यावर प्रकाश टाकणारे थीम पार्क, अँजल पॅराडाईज, ड्रॅगन पार्क, कळवा पारसिक जॉगर पार्क, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, आणि सिध्दीविनायक पार्क अशा सर्व पार्कचा समावेश आहे. 

केवळ चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क वगळता इतर सर्व थीम पार्कचा खर्च महापालिकेच्या निधीमधून केला जाणार आहे. ओल्ड आणि न्यू ठाणे तसेच बॉलिवूड पार्क सुरुवातीला बीओटी तत्वावर बांधण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला होता. कोणत्याच एजन्सीने स्वारस्य दाखवले नसल्याने अखेर हे दोन्ही पार्क पालिकेच्या निधीमधून बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.