Thu, Mar 21, 2019 11:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील एसआरए योजनेला ‘घरघर’

मुंबईतील एसआरए योजनेला ‘घरघर’

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 06 2018 1:30AMमुंबई : चंदन शिरवाळे

मुंबईतील झोपडपट्टीधारकांना इमारतींमध्ये मोफत घरे देण्यासाठी 1995 मध्ये युती सरकारने सुरु केलेल्या एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन योजना) योजनेला ‘घरघर’ लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासुन बिल्डरांनी विकासासाठी एकही झोपडपट्टी न घेतल्यामुळे ही योजनाच आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये मोक्याच्या भुखंडावर अनेक झोपडपट्ट्या आहेत. येथील रहीवाशांना नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने झोपु योजना आणली होती. गेल्या काही वर्षांपासुन खाजगी व सरकारी भुखंडावर ही योजना राबविली जात आहे. जमिन व बांधकाम विकास हस्तांतरण हक्क (टिडीआर) या तत्वावर या योजनेतील इमारती बांधण्यात येतात. पुनर्वसन इमारतीमधील घरे झोपडपट्टीधारकांना मोफत वाटप केल्यानंतर उर्वरीत जागेवर इमारती बांधुन त्यामधील सदनिकांची विक्री करण्याचे अधिकार संबधीत बिल्डरला देण्यात आले आहेत. परंतू या योजनेतील क्‍लिष्ट नियमांमुळे बिल्डर त्रस्त झाले आहेत. 

बिल्डरला एसआरए योजना राबविण्यासाठी झोपडपट्टीमधील 70 टक्के झोपडीधारकांची मान्यता आवश्यक होती. ही अट पुर्ण करण्यासाठी बिल्डरची दमछाक होत होती. प्रकल्पासाठी कोणीही पुढे येत नसल्यामुळे गरीबांना इमारतींमधील घरे मिळणार नाही, हे पाहुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अट 50 टक्क्यांवर    आणली. परंतू योजनेच्या क्‍लिष्ट अटींंमुळे बिल्डर हैराण झाले आहेत. प्रकल्प सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवसापासुन बिल्डरकडुन झोपडीधारकाला घरभाडे द्यावे लागत आहे. पात्र आणि अपात्रतेची कसोटी दोन वर्षांपर्यंत सुरु असते. अपात्र ठरलेले रहीवाशी बिल्डरच्या विरोधात तक्रारी करुन प्रकल्पात अडथळे आणत असल्याने प्रकल्प पुर्ण होईपर्यंत पात्र ठरलेल्यांना घरभाडे द्यावे लागत असल्यामुळे बिल्डर मेटाकुटीस आले आहेत.

मुंबईत आतापर्यंत 1528 एसआरए योजना मंजुर करण्यात आल्या आहेत. सध्या 3 लाख 81 हजार घरांसाठी इरादा पत्रे देण्यात आली असून 1 लाख 88 हजार घरांचे वाटप करण्यात आले आहे. पण एसआरए योजनेच्या शेजारच्या बिल्डींगमध्ये सदनिका घेण्यास धनाढ्य फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे बिल्डरांनी विक्रीसाठी बांधलेल्या अनेक सदनिकांची विक्री झाली नाही. कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक करुनही प्रत्यक्षात आर्थिक फायदा हातात पडला नाही. तसेच प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर होत नसल्यामुळे अनेकजण हवालदिल झाले आहेत. सुरुवातीला एसआरए प्रकल्पासाठी सेटींग लावणार्‍या बिल्डरांनी गेल्या दोन वर्षांपासुन मुंबईतील एकही झोपडपट्टी विकासासाठी घेतली नाही.