Mon, May 20, 2019 18:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पॉलिटेक्निक’ कोमात अन् ‘आयटीआय’ जोमात!

‘पॉलिटेक्निक’ कोमात अन् ‘आयटीआय’ जोमात!

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 1:51AMमुंबई : प्रतिनिधी

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या पाठोपाठ पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) पदविका अभ्यासक्रमांच्या जागांचे यंदाही भवितव्य अवघड आहे. यंदा केवळ 57 हजार अर्ज आले आहेत. तर दुसर्‍या बाजूला आयटीआयला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत चार फेर्‍यात 80 हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश कन्फर्म केले आहेत. त्यामुळे यंदा पॉलिटेक्निक कोमात गेले आहे तर आयटीआय जोमात असल्याचे चित्र आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पॉलिटेक्निक आणि आयटीआयचे प्रवेश एकाच वेळी सुरु केले जातात. गुणवंत विद्यार्थी दोन्हीकडे अर्ज करुन ठेवतात. एकाचवेळी प्रवेश प्रक्रिया सुरू होते, यंदा मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या अभ्यासक्रम निवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. ‘पॉलिटेक्निक’ मध्ये राज्यात 1 लाख 30 हजार 800 जागा आहेत. या जागांवर केवळ 57 हजार 997 अर्ज आले आहेत. तर आयटीआयच्या 1 लाख 38 हजार 317 जागांवर 3 लाख 95 हजार 174 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी चार फेर्‍यात तब्बल 80 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश कन्फर्मही झाले आहेत.

पूर्वी दहावीनंतर तीन वर्ष तंत्रनिकेतन केल्यानंतर अभियांत्रिकीची पदविका घेऊन विद्यार्थी मोठ्या संख्येने बाहेर पडत होते. मात्र आता या अभ्यासक्रमांना उतरती कळा लागली आहे. अनुदानित महाविद्यालयातीलच  जागा शिल्‍लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन वर्षापासून खाजगीप्रमाणे आता अनुदानित आणि शासकीय महाविद्यालयांतील जागा रिक्‍त राहत आहेत. यामुळे पदविका अभ्यासक्रमाला गेल्या तीन वर्षात चांगलाच फटका बसत आहे. यंदाही दहावीच्या वाढलेल्या निकालाचा परिणामही पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर फारसा झालेला नाही. दुसरीकडे आयटीआय ला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवत आहेत.