Mon, Jun 17, 2019 02:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोईसरमध्ये गायत्री मार्केटिंगचा गुंतवणूकदारांना १२ कोटींचा चुना

बोईसरमध्ये गायत्री मार्केटिंगचा गुंतवणूकदारांना १२ कोटींचा चुना

Published On: Feb 20 2018 1:42AM | Last Updated: Feb 20 2018 1:42AMमनोर : वार्ताहर

बोईसर येथील गायत्री मार्केटिंगच्या भेटवस्तू योजनेत आठ ते दहा हजार ग्राहकांना सुमारे तब्बल 12 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. यामुळे ग्राहक हवालदिल झाले असून कंपनी एजंटांचे जगणे मुश्कील झाले आहे. 

बोईसरच्या एसटी आगाराच्या समोरील ओत्सवाल एम्पायर या संकुलात कार्यालय उघडून 9 संचालकांनी गायत्री मार्केटिंग संस्थेमार्फत वस्तू भेट योजना सुरू केली. या योजनेत फेब्रुवारी 2016 ते सप्टेंबर 2017 या दरम्यान सुमारे 22 हजार ग्राहकांनी सहभाग घेतला. या योजनेतील प्रत्येक ग्राहकाने 13 हजार 251 इतकी रक्कम टप्प्याटप्प्याने एजंट मार्फत कंपनीमध्ये जमा केली. दर महिन्याला काढण्यात येणार्‍या लकी ड्रॉ मधून एका ग्राहकाला चार चाकी वाहन, 19 ग्राहकांना मोटारसायकल, तर 30 ग्राहकांना टी.व्ही. अशा प्रत्येकी पन्नास ग्राहकांना भेटवस्तू देण्यात आल्या. ड्रॉ काढण्याचे हे वेळापत्रक सलग वीस महिने राबवल्यानंतर बक्षीस न लागणार्‍या उर्वरित ग्राहकांपैकी सुमारे 6 ते 8 हजार ग्राहकांना वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही, एअर कंडिशनर, लॅपटॉप अशा भेटवस्तू देण्यात येणार होत्या. मात्र, या ग्राहकांना निकृष्ट, कमी किमतीच्या तसेच चिनी बनावटीच्या वस्तू दिल्या गेल्याने ग्राहकांनी बोईसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

बोईसर येथील गायत्री मार्केटिंगचे कार्यालय बंद करण्यात आले सर्व संचालक फरार झाले. 8 हजार ग्राहकांना व्याजाचा मोबदला मिळालेला नसून हा संपूर्ण घोटाळा 12 कोटी रुपयांच्या पुढे असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी रवींद्र बारी, हर्षद बारी, राजेश वझे यांच्यासह 9 संचालकांवर  26 नोव्हेंबर 2017  रोजी तक्रार दाखल करण्यात आली. काही आरोपींना मनोर येथील एका नेत्याने आपल्या घरी आश्रयाखाली ठेवल्याचा आरोप सुमारे शंभर-सव्वाशे एजंटनी पत्रकारांशी बोलताना केला.