Thu, Jul 18, 2019 16:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वीरपत्नी गौरी महाडिक जाणार लष्करी सेवेत

वीरपत्नी गौरी महाडिक जाणार लष्करी सेवेत

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:52AM

बुकमार्क करा
विरार : वार्ताहर

अरुणाचल प्रदेशातील मिलिट्री कँपमधील तंबूला लागलेल्या आगीचा बळी ठरलेल्या विरारमधील शहीद मेजर प्रसाद महाडिक यांच्या पत्नीने लष्करात रुजू होऊन देशसेवा करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला सासरच्या मंडळींनीही पाठिंबा दिला आहे.

विरारमधील गणेश महाडिक यांचे पुत्र मेजर प्रसाद (राजू) महाडिक यांचा 30 डिसेंबरला चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशातील तवांग पोस्टींग येथे लष्कराच्या कँपमधील तंबूला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यांचे देशसेवेचे अपूर्ण व्रत पूर्ण करण्याचा निर्धार पत्नी गौरी महाडिक यांनी केला आहे. गौरी यांनी लष्करी सेवेत रुजू होण्याचा आपला निर्धार कुटुंबीयांना बोलून दाखवला. कुटुंबीयांनीही त्यांना संमती देऊन पाठिंबा व्यक्त केला.

15 फेब्रुवारी 2015 ला गौरी शशिकांत पवार या गौरी प्रसाद महाडिक झाल्या. प्रसाद हे लष्करात देशसेवा करत आहेत. ते सीमेवर कार्यरत असल्यामुळे त्यांच्या जिवाला नेहमी धोका असतो, अशी कल्पना त्यांना लग्नापूर्वी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही बाब अभिमानास्पद असल्याचे स्पष्ट करून लग्नाला हसतमुखाने होकार दिला होता. मुंबईतील एका कंपनीत सी. एस. (कंपनी सेक्रेटरी) या बड्या पदावर असलेल्या गौरींना दुर्दैवाने वैवाहिक सुख फारसे लाभले नाही. यामुळे खचून न जाता आपल्या पतीचे देशसेवेचे व्रत पूर्ण करण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतला आहे.

महाडिक कुटुंब कामानिमीत्त मुंबईत स्थिरावले. या विखुरलेल्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी प्रसादने आपल्या पुढाकाराने गावी कुटगिरीला दोन वर्षांपूर्वी चिरेबंदी वाडा उभारला. वयात जास्त फरक नसल्यामुळे प्रसादचे माझे मैत्रीचे नाते होते. तो मला काकाऐवजी भाऊ म्हणून हाक  मारायचा. माझा स्वतःचा खासगी व्यवसाय असल्यामुळे व्यवसायातील चढ-उतार तो जाणून होता. भाऊ काळजी करू नको, मी आहे, असे म्हणून तो मला नेहमी धीर द्यायचा. लहान असूनही तो आमच्या कुटुंबाचा प्रमुख आधारस्तंभ होता, अशी त्यांची आठवण काका शिवाजी महाडिक यांनी सांगितली.

देशसेवेला प्राधान्य देणार्‍या प्रसादला गाव, तालुका आणि जिल्हापातळीवर सैनिकी शिक्षण देणारी अकादमी सुरू करायची होती. तरुणांनी भारतीय सैन्यात भरती होऊन भारतमातेची सेवा करावी, असे त्यांना नेहमी वाटत होते. तसेच दीनदुबळ्या लोकांची तन, मन, धनाने सेवा करण्याचीही त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा आपण पूर्ण करू, असे शिवाजी महाडिक यांनी सांगितले.