Sun, Apr 21, 2019 13:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गरीबनगर आग : फरार मुख्य आरोपीसह दोघांना अटक

गरीबनगर आग : फरार मुख्य आरोपीसह दोघांना अटक

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:35AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

गेल्या वर्षी वांद्रेच्या गरीबनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सलीम अन्वर बादशहा सय्यद ऊर्फ सलीम लाईटवाला, सलमान सलील सय्यद या दोन आरोपींना शनिवारी नालासोपारा येथून निर्मलनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. या दोघांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सलीम लाईटवाला हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 40 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आझाद मैदान येथे झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यातील तो मुख्य आरोपी असून याच गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर होता. आठ वर्षांपूर्वी त्याला बोगस नोटांच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. 

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात गरीबनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. आगीपूर्वी मनपाने तेथील स्थानिक रहिवाशांना नोटीस दिली होती. मात्र, त्यानंतरही रहिवाशांनी झोपड्या खाली केल्या नाहीत. त्यामुळे मनपाने तिथे कारवाई करण्यास सुरुवात केली.  कारवाई सुरू असतानाच तिथे भीषण आग लागली होती. ही आग सिलिंडरमुळे अधिक भडकली होती. 

ही आग लावण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस येताच सलीम लाईटवाला याच्यासह इतर आरोपींविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.  गुन्हा दाखल होताच सलीम तेथून पळून गेला. मुंबईतून तो बंगलोर आणि नंतर नालासोपारा येथे राहत होता. तिथेच त्याने कपड्याचा एक कारखाना सुरू केला. निर्मलनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने शनिवारी त्याच्यासह सलमान सय्यद या दोघांना अटक केली.