Wed, May 27, 2020 01:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीतील छेडा रोडसह गरीबाचावाडा सील

डोंबिवलीतील छेडा रोडसह गरीबाचावाडा सील

Last Updated: Apr 04 2020 6:51PM
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली शहराच्या पूर्वेकडील छेडा रोडनंतर पश्चिम डोंबिवलीच्या गरीबाचा वाडा येथील एका कॉम्प्लेक्समध्ये राहणारे गृहस्थ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याच्या वृत्ताने या परिसरात खळबळ उडाली आहे. एकीकडे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच दुसरीकडे मात्र महापालिका प्रशासनाने प्रतिबंधकात्मक उपाययोजना म्हणून हे भाग सील केले आहेत. तर याच पार्श्वभूमीवर केडीएमसीने बेदखल केलेल्या रेल्वेची कामगार वसाहत निर्जंतुकीकरण करण्याची मागणी पुढे आली आहे.

डोंबिवली शहराच्या पूर्वेकडील पाटकर शाळा परिसरात राहणारे ३५ वर्षीय गृहस्थ पेरू देशातून १६ मार्चला डोंबिवलीत आले. १५ मार्च रोजी लग्न समारंभात उपस्थित राहिलेला २८ वर्षीय तरूण तुर्कीहून दुबईमार्गे डोंबिवलीत आला आहे. त्याचबरोबर छेडा रोडला असलेल्या एका इमारतीत राहणाऱ्या गृहस्थासह एका ६५ वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले. २१ ते ३१ मार्च दरम्यान आढळलेल्या १० जणांवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, हे रुग्ण राहत असलेल्या म्हात्रे नगर, पाटकर शाळा परिसर, कोपर, आयरेगाव, तुकाराम नगर, छेडा रोडचा काही भाग प्रशासनाने सील केला आहे. 

पश्चिम डोंबिवलीतील गरीबाचा वाडा परिसरात राहणाऱ्या गृहस्थाला कोरोनाची बाधा झाल्याचे कळताच या रुग्णाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तात्काळ ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे यांनी प्रशासनाला ताबडतोब सर्व विभागाची पाहणी करून सील करण्याची मागणी केली. त्यानुसार याभागात महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकासह पोलिसही दाखल झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेदखल असलेल्या रेल्वे वसाहतीत देखील जंतुनाशक औषध फवारणी करण्याची तेथिल रहिवाश्यांनी मागणी केली आहे. ठाकुर्ली पश्चिम येथे बावन्नचाळ नावाची रेल्वेची कामगार वसाहत असून या वसाहतीत जवळपास ३०० कुटुंब वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी महापालिकेतर्फे औषध फवारणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पगारे यांनी केली आहे. रेल्वेकडे औषध फवारणीची कोणतीही व्यवस्था नसल्याची माहिती स्थानिक रेल्वे अधिकारी दीपक पाटील यांनी दिली. त्यामुळे या भागात राहणाऱ्या रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेकडून ठिकठिकाणी जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येते. तथापी त्यामध्ये रेल्वे वसाहतींचा समावेश नसल्याचे गागरिकांचे म्हणणे आहे. तरी या भागात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.