Sat, Jun 06, 2020 09:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेनेच्या बहिष्कारात धावली गोरेगाव हार्बर

सेनेच्या बहिष्कारात धावली गोरेगाव हार्बर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जोगेश्वरी : वार्ताहर

कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने शिवसेनेच्या मंत्री आणि खासदारांनी टाकलेल्या बहिष्काराच्या वातावरणातच अंधेरी ते गोरेगाव या विस्तार करण्यात आलेल्या हार्बर मार्गाचे गुरुवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्थानकाबाहेर जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

पश्चिम रेल्वेवरील हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार कधी होणार याकडे गेली अनेक महिने गोरेगावकरांचे लक्ष लागले होते. आता ही प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. यापूर्वी बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरीतील प्रवाशांना हार्बर लोकल पकडण्यासाठी अंधेरी स्थानकात यावे लागत होते. आता उपनगरीय प्रवाशांना गोरेगाव स्थानकावरुन लोकल पकडणे अधिक सोईस्कर होणार आहे. 

सुरुवातीला गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावर 1 एप्रिलपासून एकूण 49 फेर्‍या होणार आहेत. एप्रिल ते मे पर्यंत त्यात आणखीन  वाढ  करण्यात येईल. हार्बर मार्ग सध्या सीएसएमटी ते वाशी, पनवेल आणि अंधेरीपर्यंत आहे. अंधेरीपर्यंत असलेल्या सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 2009 साली सुरुवात केली होती. मात्र, अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे हार्बर लोकल सुरू होण्यास मार्च 2017 उजाडले. 

सध्या पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीतून जाणार्‍या हार्बर मार्गावरील लोकल अंधेरीपर्यंत जातात. या लोकलचा विस्तार गोरेगावपर्यंत केल्याने उपनगरातील हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या सेवेमुळे अंधेरी आणि वांद्रे हार्बर स्थानकावर पडणारा ताणही कमी होण्याची शक्यता आहे.  या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह, खासदार गोपाळ शेट्टी, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार अमित साटम, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय गुप्ता, सेंट्रलचे महाव्यस्थापक डी.के. शर्मा, रेल्वेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.


  •