Thu, Aug 22, 2019 14:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्यान, राणीबागेत रॅपर्सबंद पदार्थांना बंदी!

उद्यान, राणीबागेत रॅपर्सबंद पदार्थांना बंदी!

Published On: Apr 19 2019 1:51AM | Last Updated: Apr 19 2019 1:26AM
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील उद्यान, वीर जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीबाग) व वस्तुसंग्रहालय रॅपर्सबंद खाद्यपदार्थांसह प्लास्टिकबंद बाटल्यातील पाणी नेण्यास बंदी घालण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली आहे. याबाबतचा ठराव महापालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. 

राज्य शासनाने अविघटनशील पदार्थबंदीच्या कायद्यांतर्गत सर्व महापालिकांच्या हद्दीमध्ये प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर बंदी घातली आहे. पण याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर रोखण्याकरिता अन्य राज्यांतील महापालिकांनी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. लखनऊ महापालिकेने त्यांच्या अखत्यारित येणार्‍या उद्यान, वस्तुसंग्रहालय, प्राणिसंग्रहालय व सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या पर्यटकांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी प्लास्टिकचे आवरण असलेले खाद्यपदार्थ कागदाच्या पिशव्यांमध्ये टाकून पर्यटकांना प्रवेश देण्यात येत आहे. प्लास्टिकच्या पाण्याची बाटली आत नेण्यासाठी अनामत रक्कम आकारून, त्या बाटलीवर बारकोड लावण्यात येतो. परतीच्यावेळी बारकोडची बाटली दाखवून पर्यटकाला आपली अनामत रक्कम परत मिळवता येते. या उपाययोजनांमुळे त्या शहरातील प्लास्टिक कचर्‍याच्या प्रमाणात वेगाने घट होत आहे. त्यामुळे याच धर्तीवर मुंबई महापालिकेने उपाययोजना राबवून प्लास्टिक कचरा कमी करावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी केली आहे. 

विशेष म्हणजे याला विरोधी पक्षाने पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावाला एप्रिल महिन्यात पालिका सभागृहाची मंजुरी घेऊन तो प्रस्ताव पुढील अंमलबजावणीसाठी आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. पालिका सभागृहातील या प्रस्तावाला पालिका प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे. राणीबागेत प्रवेश देताना, प्लास्टिकच्या पाणी बाटलीला याअगोदरच बंदी घालण्यात आली आहे. रॅपर्सबंद खाद्यपदार्थांवरही बंदी घालणे शक्य आहे. पण यासाठी लखनऊच्या धर्तीवर उपाययोजना हाती घेणे शक्य आहे का, याचा अभ्यास करण्यात येईल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.