Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या सोसायट्यांवर आता कचराशुल्क?

मुंबईच्या सोसायट्यांवर आता कचराशुल्क?

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई शहराची साफसफाई व येथील जनतेचा कचरा उचलून तो वाहून नेण्याचे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. पण पालिका प्रशासन सोसायट्यांकडूनच कचरा उचलण्याचे शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. तसा प्रस्ताव घनकचरा विभागाकडून तयार करण्यात येत असून यात किती शुल्क आकरायचे याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. 

मुलुंड, देवनार व कांजूर डम्पिंग ग्राऊंडची कचरा साठवण्याची क्षमता संपत आली आहे. मुंबईत नवीन डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यासाठी पुरेशी मोकळी जागा नाही. त्यामुळे कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी मुंबईबाहेर जागा शोधण्याचे काम सुरू आहे. कचर्‍याचे प्रमाण कमी करण्यासाठी वर्षभरापूर्वी 100 मेट्रीक टन ओला कचरा निर्माण करणार्‍या सोसायटीमधील कचरा न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कचर्‍याचे प्रमाण सुमारे 2 हजार मेट्रीक टनपेक्षा कमी झाले आहे. कचर्‍याचे हे प्रमाण कमी करण्यासाठी आता सर्व गृहनिर्माण सोसायटी व व्यावसायिक संस्था, मॉल व बाजारपेठेत निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रत्येक मेट्रीक टननुसार शुल्क आकारता येईल का, याचा अभ्यास घनकचरा विभाग करत आहे. 

     गृहनिर्माण सोसायट्यांना शुल्क आकारल्यास कचर्‍याचे प्रमाण कमी होईल, असे मत एका वरिष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केले. 
     मुंबईत सध्या दररोज 7 हजार 500 मेट्रिक टन कचरा जमा होत आहे. हे प्रमाण किमान एक ते दीड हजार मेट्रिक टनने कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
     कचर्‍याचे प्रमाण कमी झाल्यास डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न निकाली निघू शकतो. एवढेच नाही तर कचरा उचलून तो वाहून नेण्यासाठी होणारा खर्चही कमी होईल, असा विश्वासही घनकचरा विभागाने व्यक्त केला. 

कचरा कमी झाल्यामुळे वर्षभरात कचरा वाहून नेण्याच्या गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये कपात झाली आहे. 2017 मध्ये मोठ्या गाड्यांच्या 17 हजार 991 फेर्‍या होत होत्या. 2018 मध्ये फेर्‍यांची संख्या कमी होऊन ती, 16 हजार 234 वर आली आहे. लहान गाड्यांच्या फेर्‍यांमध्येही सुमारे 1 हजाराहून जास्त कपात झाली आहे.