Sun, May 26, 2019 19:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणपतीच्या ‘टोल फ्री’ पासचा दुरुपयोग?

गणपतीच्या ‘टोल फ्री’ पासचा दुरुपयोग?

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 12:52AMमुंबई: महेश पांचाळ  

गणेशोत्सवासाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरुन कोकणात जाणार्‍या वाहनांना टोल फ्री करण्याचा चांगला निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी, यासंदर्भात खाजगी वाहनांना पास (स्टीकर) वितरीत करताना, कोकणातील गावच्या ठिकाणाच्या माहितीबरोबर विशेष निर्बंध टाकण्यात आले नसल्याने  त्याचा गैरफायदा या मार्गावरुन नियमित जाणार्‍या खाजगी वाहन चालकांकडून उठविला जाउ शकतो का ? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

दरवर्षी कोकणात लाखो चाकरमानी गणेशोत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणात जातात. एसटी, लक्झरी, कोकण रेल्वेच्या गाड्यांची तिकीट मिळाले नाही की हजारो गणेशभक्त हे खाजगी वाहनांनी प्रवास करणे पसंत करतात. मुंबई गोवा महामार्गावर आजही खड्ड्यांचे साम्राज्य असून, येत्या 10 सप्टेंबरपर्यंत या महामार्गावरील सर्व खड्डे बुजवू, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे. ते स्वत: जातीने शनिवारी या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. मात्र, मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले नाही तरी, या मार्गावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मुंबईकर गणेशभक्त पर्यायी मार्ग म्हणून मुंबई पुणे द्रुतगतीचा वापर करण्याची शक्यता जास्त आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण कधी होईल या आशेवर कोकणातील जनता असली तरी, सध्या असलेल्या  मुंबई गोवा महामार्गाची चाळण झाली आहे याकडे राज्य सरकार उदासिन का, असा सवाल कोकणातील जनता उपस्थित करत आहे. त्यात, कोकणात जाणार्‍या खाजगी वाहनांसाठी 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान गावांकडे जाण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा टोल फ्री केला आहे. तसेच परतणार्‍या त्याच वाहनांसाठी 23 सप्टेंबरपर्यंत या मार्गावर टोल फ्रीचा लाभ मिळता येणार आहे. 

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर तर पालघर जिल्ह्यातील वसई विरार, नालासोपरा या ठिकाणी कोकणातील जनता मोठ्या प्रमाणावर राहते. खाजगी वाहनांना स्टीकर देताना, वाहन क्रमांक, गाडीचालकांचे नाव, गाडी चालकाचे नाव,गाडी मालकांचे नाव, जाण्याची तारीख आणि मुंबई कधी परतणार ती तारीख  एवढी जुजबी माहितीची नोंद केली जात आहे. 

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन, जाणार्‍या वाहनांसाठी साधारणत: एकेरी वाहतुकीसाठी किमान 260 रुपये पडतात. मुंबई पुणे महामार्गावरुन कोकणात जाणार्‍या रस्त्यावरुन अंदाजे दिवसाला दिड हजार वाहने कोकणात जातात. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन कोकणात जाणार्‍या मोठ्या प्रमाणावरील वाहनांची वाहतुक कोंडी होउ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, गृह व परिवहन विभागाची गुरुवारी मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत ज्यांना स्टीकर वितरीत केले जातील, अशा वाहनांपैकी  मुंबई पुणे महामार्गावरुन कोकणात गणेशोत्सवासाठी जाणारी कोणती वाहने ही नेमकी कशी ओळखणार? या व्यतिरिक्त या स्टीकरचा कोणी फायदा उठवू शकतो का? असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यावेळी प्रामाणिक गणेशभक्तांसाठी राज्य सरकार सोय करत आहे, या भरवशांवर या विषयावर पडदा टाकण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर आम्हाला डिपार्टंमेंटकडून कळले नाही असेही सांगून हुज्जत घालण्याऐवजी काही कोकणातील चाकरमान्यांना टोल भरुन प्रवास केला.

कोकणात गणेशोत्सवकाळात येणार्‍या जाणार्‍या वाहनांची संख्या ही मोठी होते. त्यामुळे गर्दी होउन वाहतुक कोंडीची समस्या उदवभते.  राज्य सरकारने मुंबई पुणे हायवेवरुन पुणे, कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार्‍या वाहनांना टोल फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा कोकणातील गणेशभक्तांना निश्‍चित फायदा होणार असला तरी, मुंबई पुणे हायवेवरुन ंगणेशोत्सव 2018 कोकण दर्शन ंहा पास घेण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील किंवा बेळगांवकडे जाणार्‍या खाजगी वाहन मालकांनी विनंती केल्यास, मुंबईतील वाहतूक विभाग किंवा पोलीस विभागाकडे त्याची खातरजमा करण्याची सोय नसल्याची बाब पुढे आली आहे.

मागील वर्षीही  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने गणेशोत्सवापुर्वी कमी अवधीत मुंबई पुणे हायवेवरुन जाणार्‍या खाजगी वाहनांना पास देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अनेक गणेशभक्तांना पासची उपलब्धता करुन देणे महामंडळाला शक्य झाले नव्हते. टोल नाक्यांवरील मुले आणि कर्मचार्‍यांकडून या पासेसच्या विश्‍वासर्हतेबाबत शंका निर्माण करण्यात आली होती. टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी मग्रुरी करता कामा नये यासाठी  सरकारने लेखी आदेश टोल कर्मचार्‍यांपर्यंत पोहचतील याचीही खबरदारी घेतली पाहिजे. आम्हाला डिपार्टंमेंटकडून कळले नाही असेही सांगून टोलनाक्यांवर हुज्जत घालण्याऐवजी काही कोकणातील चाकरमान्यांना टोल भरुन प्रवास केला, अशी माहिती टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी दिली.