Sun, May 26, 2019 09:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गँगस्टर सुरेश पुजारीचे डोंबिवली कनेक्शन!

गँगस्टर सुरेश पुजारीचे डोंबिवली कनेक्शन!

Published On: Apr 26 2018 2:00AM | Last Updated: Apr 26 2018 1:24AMडोंबिवली : वार्ताहर

कुप्रसिद्ध गँगस्टर सुरेश पुजारी याचे डोंबिवली कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीतील एका हॉटेल व्यावसायिकाला 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकावणार्‍या गँगस्टर पुजारीच्या चार गुंडांचा डोंबिवली पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून ताबा घेतला आहे. या आरोपींनी खंडणीसाठी धमकावल्याची कबुलीही दिली आहे. हरीश कोटियन (29), अनिकेत ठाकूर (22), प्रथमेश कदम (22) व संकेत दळवी (25) अशी या आरोपींची नावे आहेत. या चौघांना कल्याण कोर्टात हजर केले असता त्यांना अधिक चौकशीकरीता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 डोंबिवली पूर्वेतील फडके रोडला असलेल्या मॉर्डन कॅफे हॉटेलचे मालक अजित शेट्टी यांना पन्नास पेट्या दे, नाहीतर ढगात पाठवीन, अशी धमकी देत सुरेश पुजारीने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात 50 लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच दरम्यान मुंबईतील फोर्टमधील एका कॅमेरा विक्री करणार्‍या व्यावसायिकाला खंडणीची धमकी देताना गोळीबार करून एका महिलेस जखमी करण्यात आले होते. ही घटना 21 जानेवारी 2018 रोजी घडली होती. या गुन्ह्यात सुरेश पुजारी टोळीतील पाच गुंडांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या होत्या. 

अटक आरोपींमध्ये हरीश कोटियन, संकेत दळवी, प्रथमेश कदम, नूरमहम्मद खान आणि अनिकेत ठाकूर यांचा समावेश होता. यातील चारही खंडणीखोर कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत असल्याने मुंबई पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला होता. ही चौकशी संपताच डोंबिवली पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. तपासादरम्यान त्यांनी हॉटेल व्यावसायिक अजित शेट्टी यांना खंडणीसाठी धमकावल्याची कबुली दिल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले.

Tags : Mumbai, Gangster Suresh Pujari, Dombivali connection, Mumbai news,