Tue, Aug 20, 2019 04:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गँगस्टर मयूर शिंदेची मिसळोत्सवाला हजेरी

गँगस्टर मयूर शिंदेची मिसळोत्सवाला हजेरी

Published On: Apr 11 2018 1:41AM | Last Updated: Apr 11 2018 1:27AMमुंबई : अवधूत खराडे

भांडुपमध्ये नव्याने उदयास येत असलेल्या शुटर सागर जाधव याच्या वाढदिवसाच्या बॅनर्समध्ये भाजपचा नगरसेवक झळकत असतानाच कुमार पिल्लई टोळीचा गँगस्टर मयुर शिंदे याने कांजूरमार्ग पुर्व परिसरात सेनेच्या आमदाराने आयोजीत केलेल्या मिसळोत्सवाला हजेरी लावल्याने गॅगस्टर आणि राजकीय नेत्यांचे लागेबांधे पुन्हा समोर आले आहेत. दरम्यान, सेनेला सोडचिठ्ठी देत भाजपच्या एका राज्यमंत्र्यासोबत गेलेला गँगस्टर शिंदे हा पुन्हा सेनेत परतल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत.  

वर्सस्वाचा वाद आणि पुर्ववैमनस्यामधून भांडुपमधील गुन्हेगारी विश्‍वात गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच राजकीय वरदहस्ताखाली नवे शुर्टस आपली दहशत वाढविण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी आपल्या स्वतंत्र टोळ्या तयार केल्या आहेत. गँगस्टर अमित भोगलेपासून वेगळा झालेल्या आदित्य क्षिरसागर याच्याशी हात मिळवणी करत सागर जाधव याने आपली वेगळी टोळी तयार केली आहे. या टोळीवर मुलूंडवासी भाजप नगरसेवकाचा वरदहस्त आहे. याचाच प्रत्यय सागरभाईच्या भांडूप, मुलूंड परिसरात झळकलेल्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन सर्वसान्यांना आला आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. सागरभाईने वेगळी टोळी काढून तो भाजपवासी झाला असताच तो ज्याच्यापासून वेगळा झाला त्याने म्हणजेच गँगस्टर शिंदे याने भाजपच्या राज्यमंत्र्याला सोडचिठ्ठी दिल्याचे चित्र दिसले. गँगस्टर शिंदे याने कांजूरमार्ग परिसरात एका सेनेच्या आमदाराने आयोजीत केलेल्या मिसळोत्सवाला हजेरी लावली. मिसळोत्सवाला उपस्थीत असलेल्या दोन मराठी अभिनेत्यांनाही आलिंगन देत, त्यांच्यासोबत मिसळ खाण्याचा आस्वाद लुटला. शिंदे याची तडीपारी गेल्या महिन्यातच संपल्याची माहिती मिळते.

त्यामुळे तो पुन्हा या विभागात आपले पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सेनेच्या ज्या आमदाराने मिसळोत्सवाचे आयोजन केले होते. त्या आमदारासोबत शिंदे कायम दिसायचा. सेनेमध्ये शिंदेला पदसुद्धा देण्यात आले होते. मात्र मुलूंडमध्ये पोलिसाला केलेली मारहाण आणि कांजूरमार्गमध्ये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. गँगस्टर शिंदेला त्याच्या साथिदारांसह अटक झाली आणि त्याला शहरातून तडीपार करण्यात आले. दरम्यानच्या काळात भाजपच्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजप राज्यमंत्र्याच्या वरदहस्ताखाली तो वावरु लागला.

ठाणे जिल्ह्यातून गँगस्टर शिंदेला भाजप प्रवेश देण्यातही आला. मात्र प्रसिद्धी माध्यमांनी ही बातमी दाखविल्यानंतर शिंदेचा पक्षप्रवेश रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते. गेल्या महिन्यातच शिंदे हा एका अंतयात्रेत दिसला होता. त्यानंतर त्याने मिसळोत्सवाला हजेरी लावल्याने तो सेनेत परतल्याचे बोलले जाते. 

Tags : mumbai, mumbai news, Gangster Mayur Shinde, Misal festival, attendance,