Sun, Jul 21, 2019 06:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छोटा राजनसह ९ जणांना जन्मठेप

छोटा राजनसह ९ जणांना जन्मठेप

Published On: May 02 2018 12:39PM | Last Updated: May 02 2018 4:53PMमुंबई : प्रतिनिधी

भरदिवसा भररस्त्यात ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय ऊर्फ जे. डे यांची हत्या केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह नऊ जणांना मोक्‍का विशेष न्यायालयाने दोषी ठरविले. तर महिला पत्रकार जिग्‍ना वोरा आणि आरोपींना मोबाईल सिमकार्ड पुरविल्याचा आरोप असलेल्या पॉलसन जोसेफ या दोघा जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्‍तता केली. 

सत्र न्यायालयाचे विशेष मोक्‍का न्यायाधीश समीर अडकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय देताना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह दोषी ठरविलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे नऊही आरोपींना  जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर नऊपैकी 8 जणांना प्रत्येकी 26 लाखांचा दंड न्यायालयाने ठोठावताना दीपक सिसोदियाला मात्र दंडातून वगळण्यात आले. यावेळी कारागृहात असलेल्या छोटा राजनला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. खटला सुरू असताना या खटल्यातील प्रमुख आरोपी छोटा राजनचा बालमित्र विनोद असरानी ऊर्फ विनोद चेम्बूरचा मृत्यू झाला.

11 जून 2011 रोजी जे. डे दुचाकीवरून पवई येथील निवासस्थानी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पाच गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेल्या जे. डे यांचा हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला. या हत्येची जबाबदारी स्वत: छोटा राजनने स्वीकारली होती.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही हत्या छोटा राजनच्या सांगण्यावरूनच झाल्याचा दावा करून जे. डे यांच्यावर गोळ्या झाडणारा सतीश थंगप्पन जोसेफ ऊर्फ सतीश काल्या आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेल्या पत्रकार जिग्‍ना वोरा, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी ऊर्फ विनोद चेंबूर, पॉलसन जोसेफ व दीपक सिसोदिया यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले. त्यानंतर राजनच्या अटकेनंतर अन्य प्रकरणांसह डे हत्याकांडाचा तपासही केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. आरोपपत्र दाखल केल्यानंतर  सत्र न्यायालयाच्या  विशेष मोक्‍का न्यायालयाचे  न्यायाधीश समीर अडकर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने  बुधवारी सकाळी सुरुवातीला कुख्यात छोटा राजनसह काल्या, शिंदे, डाके, गायकवाड, वाघमोडे, शेंडगे, अगनावे, असरानी आणि दीपक सिसोदिया या 9 जणांना दोषी ठरवले. त्यानंतर त्यांच्या शिक्षेसंदर्भात उभय पक्षांच्या युक्‍तिवाद झाला. 

विशेष सरकारी वकील प्रदीप धरत यांनी ही हत्या समाजातील चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला असल्याने आरोपींना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. उभय पक्षांच्या युक्‍तिवादानंतर न्यायालयाने सर्वच्या सर्व नऊही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जे. डे यांनी गुन्हेगारी जगतावर लिहिलेल्या पुस्तकामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अस्वस्थ होता आणि त्यात जे. डे यांना मारण्यासाठी जिग्‍ना वोरा हिने चिथावणी दिली. त्यामुळे छोटा राजनने डे यांना मारण्यासाठी गुंडांना सुपारी दिली, असा दावा  सीबीआयने केला होता.

आरोपींविरोधातील आरोपपत्रात  भादंवि कलम 120 (हत्येचा कट आखणे) 302 (हत्या करणे), 34 (कट अंमलात आणणे) तसेच कलम 201 सह शस्त्रास्त्रे बाळगणे, त्याचा वापर करण्याच्या कलम 3.25.27 आणि मोक्‍का कायद्याच्या कलम 3(1), 3(2), कलम 3(4) आदी आरोप तसेच  180 साक्षीदारांची नावे आणि तिघा आरोपींच्या कबुली जबाबाचा समावेश आहे.

Tags : journalist J Deys Murder case, Gangster Chhota Rajan,