Tue, Jul 23, 2019 02:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शस्त्रास्त्र साठ्यामागे मुंबईत गँगवॉर भडकवण्याचा डाव

शस्त्रास्त्र साठ्यामागे मुंबईत गँगवॉर भडकवण्याचा डाव

Published On: Dec 19 2017 2:02AM | Last Updated: Dec 19 2017 1:37AM

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

उत्तरप्रदेशातील गोदामामधून चोरी करुन मुंबईत आणण्यात येणार्‍या शस्त्रसाठ्यामागे टोळीमध्ये गँगवार घडविण्याचा प्रयत्न होता, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. शस्त्रसाठा आणताना अटक केलेल्या बदयुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत उर्फ सुका (27) याच्याकडे याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांसह राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेने कसून चौकशी सुरू केली आहे.

मुंबईत आणण्यात येणारा हा शस्त्रसाठा डोंगरी परिसरात उतरविणार असल्याची कबुली सुका याने तपासात दिल्यानंतर गुन्हेशाखेसह एटीएसच्या पथकाने सुका राहात असलेल्या शिवडी क्रॉस रोड आणि डोंगरी, नागपाडा परिसरावर करडी नजर ठेवली आहे. मुंबईमधील या गुन्हेगारी कारवायांच्या शक्यतेतून एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सोमवारी दुपारी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह गुन्हे शाखेचे प्रमुख संजय सक्सेना यांच्यासोबत एक बैठक घेतल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते.

कुख्यात मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीम याचा भाऊ अनिससोबत असलेला वाद आणि वाढलेल्या हस्तक्षेपातून खास हस्तक छोटा शकिल याने दाऊदची साथ सोडली. शकील दाऊदपासून वेगळा झाल्यानंतर अनिस डी गँगचा कारभार पाहत आहे. याच वादातून गँगवार घडविण्यासाठी हा शस्त्रसाठा मागविण्यात आल्याची माहिती मिळते.

डी गँगसाठी काम करणार्‍या मुंबईतील हस्तकांनी सुका याच्याकडून थेट शस्त्र घेतली नसल्याचे सांगताना, वरच्या पातळीवर हा व्यवहार घडला असल्याची माहिती दिल्याचे गुन्हे शाखेकडून समजते.

छोटा शकील आणि अनीस मधील अंतर्गत वाद वाढल्याने दोघेही एकमेकांच्या विश्‍वासू साथिदारांना टार्गेट करण्याच्या मागे लागले आहेत. त्यातच रवी पुजारीचे दक्षिण मुंबईतील हस्तक शकिलसाठी काम करत असून अंडरवर्ल्डमध्ये अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. विशेषत: पाकमोडीया स्ट्रीट, भेंडीबाझार, नागपाडा आणि डोंगरीमध्ये याचे परिणाम दिसण्याची शक्यता असून येत्या काळात गँगवार घडण्याची भीती अंडरवर्ल्डमधून व्यक्त करण्यात येत आहे.

कराचीतील अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेल्या सुका याने नागपाडा आणि शिवडीच्या नॅशनल मार्केट परिसरातील उत्तर भारतीय गुन्हेगारांच्या मदतीने शस्त्रास्त्रे लुटीचा प्लॅन आखून तो यशश्‍वी केला. मात्र मुंबई-आग्रा महामार्गावर डिझेलचे पैसे न देता पळून गेल्याने पोलिसांनी पाठलाग करत नाशीक चांदवड टोलनाक्यावर हा शस्त्रसाठा जप्त करत, सुका याच्यासह सलमान अमानुल्ला खान (19) व चालक साथिदार नागेश बनसोडे यांना बेड्या ठोकल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पकडला गेल्याने अंडरवर्ल्ड जगतातही खळबळ उडाली असून अनेकजण अंडरग्राऊंड झाल्याची माहिती मिळते.