Sun, Nov 18, 2018 14:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यंदाही बाप्पा महागणार!

यंदाही बाप्पा महागणार!

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:38AMमुंबई : रोहिणी साळुंखे

कामगारांचे पगार,जीएसटीमुळे महागलेले साहित्य, पेट्रोल व डिझेल दरवाढ या सगळ्याचा परिणाम यंदाच्या गणेशमूर्तींवर दिसणार आहे. गणेशमूर्तींच्या किमतीत जवळपास 20 टक्क्यांनी वाढ होणार आहे. गणेश चतुर्थी अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अनेक ठिकाणी रंगकाम करण्यात मूर्तिकार ांचे हात गुंतले आहेत. गणेशमूर्ती घडविण्यासाठी तीन ते चार महिने अगोदर सुरुवात करावी लागते. मुंबई शहरातील चित्रशाळांमध्ये गणेशमूर्ती बनवण्याचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. 

शाडूची, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक पेंट, वॉटर पेंट, काथ्या यांच्या किमतीत वाढ झाली असून, शाडू मातीच्या मूर्तींपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती स्वस्त असल्याने त्यांना मोठी मागणी येण्याची शक्यता आहे. यावर्षी शाडू मातीची मागणी वाढली आहे. 

शाडूच्या मूर्ती दिवसाला फक्त 2 ते 3 तयार होऊ शकतात. जास्त मागणीमुळे यावर्षी इको फ्रेंडली गणपती अजून महागण्याची शक्यता आहे. कागदी लगदा, पेपरच्या देखील मूर्ती बाजारात जास्त प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे. मूर्तीच्या किमती नक्षीकामावर अवलंबून असतात. मग मूर्ती भले एक फुटाची असो किंवा मोठी असो तिचे नक्षीकाम उत्तम असेल तर ती हजारोंच्या घरात जाते. 

कल्पकतेनुसार सजवलेल्या गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ होत असते. साधी दोन फुटांची मूर्ती अडीच हजारला मिळत असेल तर तीच मूर्ती स्टोन, कुंदन, लेस, चकमकी कलर लावलेली चार हजार पाचशेपर्यंत विकली जाते, असे काही मूर्तिकारांनी सांगितले.