Fri, Jul 19, 2019 01:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणेशमूर्ती महागल्या; भक्तांच्या खिशाला बसणार फटका!

गणेशमूर्ती महागल्या; खिशाला बसणार फटका!

Published On: Aug 30 2018 2:20AM | Last Updated: Aug 30 2018 8:14AMमुंबई : तन्मय शिंदे

कच्चा मालाचे भाव, कारागिरीचे दर वाढल्याने शाडूच्या तसेच पर्यावरणपूरक कागदी लगद्यापासून बनविण्यात येणार्‍या गणेशमूर्तींच्या किमतीत तब्बल 500 ते 1000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव थाटामाटात साजरा करणार्‍या गणेशभक्तांनाच्या खिशाला यंदाच्या गणेशोत्सवात चांगलाच फटका बसणार आहे.

महागाईच्या विळख्यात भरडल्या जाणार्‍या मुंबईकरांना उत्सव साजरे करतानाही महागाईचा चांगलाच फटका बसत आहे. गणेशोत्सवानिमित्त वाढणार्‍या खर्चात गणेशमूर्तींच्या वाढत्या किमतींमुळे अजूनच भर पडली आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावरही गणेशभक्तांना मर्यादा आल्या आहेत. यंदा गणेशमूर्ती जीएसटीमधून वगळल्या असल्या तरी  मातीच्या गोणीच्या किमतीत 25 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणार्‍या काथ्याचा एक गुच्छ मागील वर्षी 900 रुपये होता त्याची किंमत यावर्षी 1400 रुपयांवर जाऊन पोहचली आहे. गणेशमूर्ती बनविणार्‍या कारागिरांच्या कारागिरीही 500 ते 600 रुपयांनी वाढली आहे. तसेच रंगाचे ब्रश, मूर्ती घासण्याच्या जाळ्या, रंग व काथ्याच्या किमतीत कमालीची वाढ झाल्यामुळे गणेशमूर्ती महागल्या आहेत.  

कारागिरांना देण्यात येणारे मानधन, कच्चा माल यामध्ये वाढ झाल्याने गणेशमूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी कारागीर मिळत नसल्याने 500 ते 600 रुपयांची वाढीव मागणी हे कारागीर करत आहेत.  लोकांकडून शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची मागणी पूर्ण होत नाही. शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी पूर्ण होण्यासाठी मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याकडे आपला कल वळवायला पाहिजे. तसेच  पीओपीपासून बनविण्यात येणार्‍या मूर्तीच्या किमतीत वाढ झालेली नाही असे लालबागमधील सिद्धिविनायक कार्यशाळेमधील शाडूच्या गणेशमूर्ती बनविणारे भरत मसुरकर म्हणाले.

> गणेशमुर्तींची सजावटीसाठी लागणार्‍या डायमंड वर्कही महागले. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा 100 रुपये वाढले आहेत. त्यामुळे 400 ते 700 रुपये लागणार्‍या
मुर्तीसाठी 500 ते 1000 रुपये मोजावे लागणार आहेत. अशी माहिती मुर्तीवर डायमंड वर्क करणार्‍या गणेश चित्रशाळेचे संदेश बामणे यांनी सांगितले. 

> पर्यावरणपुरक एक मुर्ती बनविण्यासाठी 2500 रुपये खर्च होत असल्यामुळे सर्व मुर्तींपेक्षा पर्यावरणपुरक कागदाच्या लगद्यापासून बनविण्यात येणार्‍या मुर्तीची किंमत जास्त आहे. घोडपदेवमधील पर्यावरणपुरक कागदाच्या लगद्यापासून गणेशमुर्ती बनविणारे मंगेश सारदळ म्हणाले.