Sat, Jul 20, 2019 15:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माघी गणेश जयंतीची निमंत्रण पत्रिका उर्दूतही!

माघी गणेश जयंतीची निमंत्रण पत्रिका उर्दूतही!

Published On: Jan 15 2018 9:34AM | Last Updated: Jan 15 2018 9:34AM

बुकमार्क करा
विरार : प्रथमेश तावडे

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या माघी गणेशोत्सवाची जोरदार तयारी सर्वत्र सुरू आहे. विरार येथील एका कुटुंबातील महिला गणेशभक्‍तांनी मराठी बरोबरच उर्दू भाषेत या गणेशोत्सवाची निमंत्रण पत्रिका छापून वसई तालुक्यातील सामाजिक सलोखा अधिकच दृढ केला आहे. धर्माच्या नावावर देशात कुठेही दंगे झाले तरी वसई तालुक्यातील कधीही त्याचे पडसाद उमटले नाहीत. येथील हिंदू- मुस्लिम-ख्रिश्‍चन बांधव तसेच इतर धर्मिय नेहमीच एकोप्याने राहिले आहेत आणि राहत आहे. त्यासाठी आणखी एक पाऊ ल पुढे टाकत भोईर कुटुंबीयांनी छापलेली आणि वाटलेली निमंत्रण पत्रिका संपूर्ण विरार परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

एकमेकांच्या धर्माचा आदर करणे, एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होणे हे येथे नित्याचेच आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी वसई पूर्व भागात मुस्लिम बांधव सरबताचे, नाश्त्याचे वाटप करतात, तर मोहरममध्ये ताजियामध्ये सहभागी झालेल्या भक्‍तांना हिंदू बांधव सरबत आणि नाश्त्याचे वाटप करतात. इतर सण आणि उत्सवातही हा एकोपा विरारमध्ये नेहमीच दिसून येतो. त्यासाठी समाजातील ज्येष्ठ मंडळींबरोबरच तरूणही प्रयत्न करत असतात. उर्दूतून निमंत्रण पत्रिका छापून आणि वितरित करून भोईर कुटुंबीय सामाजिक एकोप्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग झाले आहेत.

विरार पश्‍चिमेतील आगाशी-बारीवाडा येथील भोईर कुटुंबातील महिलांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. भोईर कुटुंबियांकडे माघी गणपती येतो. या गणपतीच्या दर्शनासाठी सर्वधर्मिय त्यांच्याकडे येतात. यंदा या महिलांनी पुढाकार घेऊन मराठी बरोबरच उर्दु भाषेत निमंत्रण पत्रिका छापली असून त्याचे वाटपही केले आहे. भोईर कुटुंबियांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.