होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गडकरी रंगायतन नाट्यगृहाला मिळणार नवी झळाळी 

गडकरी रंगायतन नाट्यगृहाला मिळणार नवी झळाळी 

Published On: Aug 15 2018 1:52AM | Last Updated: Aug 15 2018 1:52AMठाणे : प्रतिनिधी 

शहरात मानाचा तुरा रोवणार्‍या गडकरी रंगायतनला 40 वर्षांचा काळ लोटला आहे. आता या वास्तुची शान टिकविण्यासाठी पालिकेने मजबुतीकरण करण्याचे निश्चित केले आहे. या वास्तुचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्यानंतर त्याची डागडुजी करता येऊ शकते, असा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आता 16 कोटींचा खर्च करून या इमारतीची डागडुजी केली जाणार आहे. 

या संदर्भातील प्रस्ताव येत्या 20 ऑगस्टच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतनची इमारत 40 वर्षे जुनी आहे. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानंतर आता पालिका या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे. त्यानुसार या इमारतीचे मजबुतीकरण, नूतनीकरण, टॉयलेट दुरुस्ती व नूतनीकरण, संपूर्ण प्लंबिंग व ड्रेनेज सिस्टिमचे नूतनीकरण, संपूर्ण इमारतीच्या आतिल-बाहेरील रंगकाम, ऑडिटोरियमचे फॉल सीलिंग व वॉल क्लॉडिंग, अकॉस्टिकचे काम, इमारतीच्या बाहेरील बाजूला वॉल क्लॅडिंग करणे, ऑडिटोरियममधील सर्व चेअर्स, कारपेट नवीन करणेे, स्टेजचे नूतनीकरण व पडद्याचे काम करणे, इमारती सभोवतालच्या संरक्षक भिंतीचे व फेन्सिंगचे काम करणे, सुरक्षा रक्षक केबिन व बाहेरील बाजूस टॉयलेट बांधणे, अग्निशमन यंत्रणा बसविणे, विद्युत कामे, स्टेज लायटिंग, सीसीटीव्ही बसविणे, एसी बसविणे, वॉटर कुलर, वार्षिक देखभाल पुढील 3 वर्षांकरिता तांत्रिक सल्लागार असा एकूण 16 कोटी 31 लाख 60 हजारांचा खर्च या कामी केला जाणार आहे.