Fri, May 24, 2019 20:51



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साकीनाक्यात अग्नितांडव!

साकीनाक्यात अग्नितांडव!

Published On: Dec 19 2017 2:02AM | Last Updated: Dec 19 2017 1:58AM

बुकमार्क करा





मुंबई  : प्रतिनिधी 

अंधेरीच्या साकीनाका परिसरात फरसाणच्या दुकानाला भीषण आग लागून बारा मजुरांचा मृत्यू झाला. पहाटे 4 वाजून 16 मिनीटांनी ही आग लागली आणि आगित खैराणी रोडवरील भानू फरसाण हे दुकान 12 मजूरांसह भस्मसात झाले. या आगीतून नशिबानेच बचावलेले अखिलेश तिवारी म्हणाले, दुकानात 20 ते 22 कर्मचारी झोपले होते. दुकानाच्या पहिल्या आणि तळमजल्याला आग लागली. जीव वाचवण्यासाठी सर्वांनी खिडकीतून उड्या मारल्या. आग विझत नसल्याने अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी दुकानात जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी दुकानाचे छत कोसळले. त्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही.सर्व मृतदेह जळून खाक झाल्याने ओळखताही येत नाही. पण महेशच्या कपड्यावरून मी त्याला ओळखले. पाय मुरगळला म्हणून मी घरी गेलो नसतो तर भावाला पुन्हा आगीत जाऊच दिले नसते. माझ्या एका चुकीमुळे मी माझ्या मोठ्या भावाला गमावले.  

एका क्षणात होत्याचे नव्हते झाले!

मुंबई : प्रतिनिधी

भानू फरसाण दुकानातील अग्नितांडवातून अखिलेश तिवारी सुदैवाने वाचले. पायाला चटका लागल्याने त्यांना जाग आली. आगिबाबात सांगताना ते म्हणाले, पायाला अचानक चटके बसू लागले, म्हणून जाग आली. पाहतो तर काय. दुकानात आगच-आग दिसत होती. काहीच समजत नव्हते. आगीची तीव्रता एवढी होती की आग विझतच नव्हती.

अग्नीशमन दलाच्या अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या खैराणी रोड परिसरातील या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाली. 4.34 मिनीटांनी अग्नीशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि दुकानात अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र दुकानातील आग पसरत होती. धूर आणि आग यांच्यामुळे पहिल्या मजल्यावर अडकलेले कर्मचारी बाहेर येऊ शकले नाहीत. आगीच्या तीव्रतेमुळे पोटमाळाही कोसळला. ज्यामुळे पोटमाळ्यावर अडकलेले सर्व कर्मचारी आगीत सापडले. पोलीस आणि अग्नीशमन अधिकार्‍यांनी आगीत अडकलेल्या सर्व मजूरांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पण, आगीत होरपळून या मजूरांचा मृत्यू झाला होता.

आग तळमजल्यावर लागली. मजूर जीव वाचवण्यासाठी पोटमाळ्यावर चढले. पण, धूर आणि आगीमुळे त्यांना बाहेर पडता आले नाही, असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश धर्माधिकारी  यांनी सांगितले. अखिलेश यांचा भाऊ महेश तिवारींचा अग्नितांडवात बळी गेला. 

35 वर्षीय महेश याच दुकानात काम करत होते. रात्री आपल्या सहकार्‍यांसह दुकानात झोपले होते. अचानक दुकानात आग लागली. पाहता-पाहता आग दुकानात पसरत गेली. या आगीत महेश यांचा इतर सहकार्‍यांना वाचवताना जीव गेला.

पवार कुटुंबाचे छप्पर हिरावले 

साकीनाक्यामध्ये लागलेल्या आगीत संपूर्ण फरसाण कंपनी उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे आतील खोलीत राहणार्‍या लता तानाजी पवार (48) या अंध महिलेसह तुषार पवार(28), तेजस पवार(26) या तिच्या दोन मुलांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय कारखान्याची देखरेख करायचे. पहाटे आग लागल्यानंतर हे कुटुंब आणि सोबतचे झोपलेले सहा कामगार कारखान्याबाहेर पळाले. सुदैवाने यात त्यांचा जिवही वाचला. परंतु आगीत घरातील साहित्य,  कागदपत्रे जाळून खाकी झाले आहेत. लता पवार या अंध असून त्यांचे पती दीड वर्षांपूर्वी मृत्यू पावले आहेत. दोन्ही मुले हाताला मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करायचे. सध्या लता यांनी बहिणीकडे आसरा घेतला आहे. तर तर दोन्ही भावांनी मित्रांच्या घरी तात्पुरता निवारा शोधला आहे. त्यामुळे या आगीत बेघर झालेल्या या मराठी गरीब कुटुंबाची शासनाने निवार्‍याची व्यवस्था करावी, अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष संजय मुळे यांनी केली आहे.