Sun, Jul 21, 2019 05:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पांगारकरकडून शस्त्रांसाठी फंडिंग

पांगारकरकडून शस्त्रांसाठी फंडिंग

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:49AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हिंदुवादी संघटनेच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्याकडे मोठ्याप्रमाणात सापडलेली स्फोटके, शस्त्रसाठ्यासाठी सेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यानेच फंडिंग केले. या आर्थिक व्यवहारांच्या तपासणीसह त्याच्याजवळ हिंदुवादी विचारसरणीची पुस्तके, कागदपत्रे, तीन मोबाईल, पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क सापडली आहेत. याच्या चौकशीसाठी एटीएसने केलेल्या मागणीवरून सत्र न्यायालयाने सोमवारी पांगारकरला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

एटीएसने नालासोपार्‍यातील भंडारआळीमध्ये राऊतच्या घरावर, तसेच घराशेजारील दुकानगाळ्यावर छापेमारी करून मोठ्याप्रमाणात स्फोटके आणि स्फोटकांचे साहित्य जप्त केले होते. राऊत याच्यासह कळसकरला नालासोपार्‍यातून आणि गोंधळेकर याला पुण्यातून अटक केली. तिघांच्याही चौकशीतून एटीएसच्या पथकाने नालासोपारा आणि पुण्यामध्ये छापेमारी करून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा, तसेच शस्त्रे बनविण्याचे साहित्य जप्त केले. या सगळ्यासाठी सेनेला रामराम करत औरंगाबादेत वास्तव्यास असलेल्या कट्टर हिंदुवादी विचारसरणीच्या पांगारकरने फंडिंग केल्याचे एटीएसच्या कसून चौकशीत उघड झाले आहे.

गेले दोन दिवस पांगारकर हा एसटीएसच्या ताब्यात होता. त्यावेळी एटीएसने पांगारकरकडून ताब्यात घेतलेल्या मोबाईल, पेनड्राईव्ह आणि हार्डडिस्कची तपासणी का केली नाही. तसेच पांगारकर हा नगरसेवक होता. त्यावेळी त्याने आपले सर्व आर्थिक व्यवहार जाहीर केले होते, असा युक्तिवाद पांगारकर याच्या वतीने अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी न्यायालयात केला. तसेच न्यायालयानेही पांगारकरकडे सापडलेली पुस्तके बंदी घातलेली होती काय, तसेच कागदपत्रांबाबत एटीएसकडे विचारणा केली.

जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पांगारकर याचा गुन्ह्यातील सहभाग समोर येताच एटीएसने शनिवारी आणि रविवारी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली. अखेर रविवारी सायंकाळी उशिरा त्याला याच गुन्ह्यात अटक करण्यात आली. एटीएसच्या पथकाने सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास पांगारकरला सत्र न्यायालयामध्ये हजर केले. यावेळी सरकारी वकिलांनी पांगारकरकडे सापडलेल्या मोबाईल, पेनड्राईव्ह आणि हार्डडिस्क या ऐवजांची न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पडताळणी करणे, तसेच पांगारकरने स्फोटके, शस्त्रसाठ्यासाठी केलेल्या फंडिंगचे आर्थिक व्यवहार तपासणे, त्याच्याजवळ सापडलेली कागदपत्रे आणि पुस्तके, तसेच पांगारकर याने काही ठिकाणांची रेकी केली असून चौकशीसाठी त्याच्या कोठडीची मागणी न्यायालयात केली.