Sun, Apr 21, 2019 00:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, पुण्यात दगडफेक, तोडफोड

मुंबई, पुण्यात दगडफेक, तोडफोड

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 1:35AMमुंबई : प्रतिनिधी

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला महाराष्ट्रात मुंबईसह राज्यात प्रतिसाद मिळाला. मुंबईत काही भागात कडकडीत बंद होता. मनसे कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी दुकाने बंद केली. दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. पुणे पिंपरी-चिंचवडला बसची जाळपोळ व तोडफोड झाली.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने देशव्यापी बंद पुकारला होता. त्याला 21 पक्षांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र, प्रत्यक्षात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंदला पाठिंबा दिला.

मुंबईत सोमवारी सकाळी काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह अंधेरी स्थानकात थेट रुळांवर उतरून रेल रोको केले. अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह अन्य नेते यामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनाने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर या कार्यकर्त्यांना बाजूला पान 1 वरून... करण्यात आले. यामुळे लोकलसेवा 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. सरकारने दडपशाही सुरू केली असून, जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मनसेने केली दुकाने बंद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई शहराच्या विविध भागात फिरून बंदचे आवाहन केल्याने सकाळी काही प्रमाणात सुरू झालेले तुरळक व्यवहार ठप्प झाले. काही भागात संपूर्ण व्यवहार बंद होते. तर काही भागातील दुकाने उपाहारगृहे दुपारपर्यंत बंद असल्याचे चित्र होते. तर काही मल्टिप्लेक्सही बंद होती.

14 बसच्या काचा फुटल्या

मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर परिसरातून अच्छे दिनची अंत्ययात्रा काढून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्याने वातावरण काही काळ तंग झाले. ही प्रेतयात्रा ताब्यात घेताना पोलिस व मनसैनिकांमध्ये चांगलीच झटापट उडाली. पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोडागाडीतून मिरवणूक काढत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. चेम्बूरला ट्रेलर आडवा लावून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. चेम्बूरला झालेल्या दगडफेकीत सुमारे 40 ते 45 वाहनांचे नुकसान झाले. 14 बसच्या काचा फुटल्या, तर एका बसच्या टायरमधील हवा काढण्यात आली.

भाजप कार्यालय फोडले

दिंडोशीला भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. तर डी. एन. नगर येथे मनसेच्या  कार्यकर्त्यांनी काहीकाळ मेट्रो रोखून धरली. मेट्रो मार्गावर उतरून त्यांनी मनसेचा झेंडा फडकावत घोषणा दिल्या. यामुळे काही काळ मेट्रोची वाहतूकही विस्कळीत झाली. नवी मुंबईतील कांदा-बटाटा मार्केटही त्यांनी बंद केले.

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

प्रभादेवीला सिद्धीविनायक मंदिरात कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली.

ठाण्यात दुकाने रिक्षा बंद

ठाणे शहरातील दुकाने बंद होती, तसेच रिक्षाही बंद होत्या. बस वाहतूक अंशत: सुरू होती. तर मल्टिप्लेक्स व इतर व्यवहारही काही काळ बंद होते. वाडा, जव्हार या भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. रायगड व पालघरलाही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही व्यवहार सुरू होते. 

बंद यशस्वी झाल्याचा दावा

दरम्यान, बंद संपूर्णपणे यशस्वी झाल्याचा व जनतेने इंधन दरवाढीला विरोध केल्याचा दावा काँग्र्रेस व मनसेच्या नेत्यांनी केला आहे.

पुण्यात तोडफोडीच्या घटना

इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे आवाहन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दौंड येथे आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत एका एस.टी. बसचे नुकसान झाले, तर एक विद्यार्थी जखमी झाला. नगरमध्ये  बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. दुपारी तीन वाजेपर्यंत एस.टी. बस बंद ठेवण्यात आल्या होत्या.

पुणे शहरात सकाळच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुमठेकर रोडवर आणि मार्केटयार्ड परिसरात पीएमपीच्या बसेसवर दगडफेक केली, तर पौड रस्त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी चार पीएमपी बसेसच्या टायरमधील हवा सोडली, त्यामुळे वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली. आठवड्याचा पहिला दिवस असूनही रस्त्यावर नेहमीपेक्षा वाहतूक कमी होती. शाळा-महाविद्यालये सुरू होती. कुमठेकर रोडवरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. एस.टी. प्रवाशांची संख्या दररोजपेक्षा 30 टक्क्यांनी घटल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंददरम्यान पुण्यातील काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

सोलापुरात बंद, मोर्चा

सोलापुरात सर्व मुख्य बाजारपेठा बंद दिसून आल्या. सकाळी 11 च्या सुमारास जमावाने रेल्वे स्टेशनसमोर टायर जाळल्या. त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जमावाने दुकाने बंद करण्याचे आवाहन करताच नवी पेठ पूर्णपणे बंद झाली. पोलिसांच्याच पेट्रोल पंपावर आडम मास्तरांनी मोर्चा काढला.

मराठवाड्यात ‘भारत बंद’ संंमिश्र

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी आवाहन केलेल्या बंदला सोमवारी मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. 

भारत बंदमध्येच पुन्हा इंधन दरवाढ

एकीकडे देशभर विरोधकांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आजही पेट्रोल व डिझेल दरात वाढ झाली. पेट्रोल 23 पैशांनी, तर डिझेल 22 पैशांनी महागले. दिल्‍लीत पेट्रोल दर 80.73 रुपयांवर गेले असून, डिझेल दर 72.83 रुपयांवर गेले आहेत. मुंबईत पहिल्यांदाच पेट्रोल दर 88.12 रुपयांवर, तर डिझेल दर 77.32 रुपयांवर गेले आहेत.