Mon, Jan 21, 2019 19:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजपासून अधिवेशनाचा शेवटचा आठवडा

आजपासून अधिवेशनाचा शेवटचा आठवडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप या आठवड्यात वाजणार आहे. बुधवार  दि. 28 मार्च हा अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर दाखल केलेला अविश्‍वास प्रस्ताव बारगळणार की विरोधकांना तो मांडू देणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत भूमिका निश्‍चित करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी सकाळी बैठक होणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांवर  अविश्‍वासाचा प्रस्ताव दिला होता. गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव चर्चेला घ्यावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली होती. योग्यवेळी या प्रस्तावावर चर्चा करण्याचा दिवस निश्‍चित करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ही मागणी करण्यात आली, त्यावेळी विरोधकांनी हा प्रस्ताव मांडू द्यावा, आमचे 29  सदस्य नियमाप्रमाणे  उभे राहून प्रस्तावाला पाठिंबा देतील, चर्चेचा दिवस नंतर निश्‍चित करण्यात यावा, अशी मागणीही विरोधकांनी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोधकांची ही खेळी उलटवत अध्यक्षांवर सरकार पक्षाकडूनच विश्‍वासदर्शक ठराव मांडला. शिवसेनेनेही त्याला पाठिंबा दिल्याने कोणतीही चर्चा न  होता आवाजी मतदानाने हा विश्‍वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. 

सरकारनेच अध्यक्षांवर विश्‍वासदर्शक ठराव आणल्यामुळे आता विरोधकांच्या अविश्‍वास ठरावाचे भवितव्य अधांतरी असल्याचे मत राजकीय विश्‍लेषकांकडून व्यक्‍त केले जात आहे. तर विश्‍वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतरही विरोधकांची अविश्‍वास ठराव आणण्याची तयारी आहे. कारण विश्‍वासदर्शक ठराव संमत होताच विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकारने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप करत आमचा ठराव मांडण्याचा अधिकार कायम असल्याचे म्हणणे मांडले होते. आता आम्ही काही प्रमुख मंडळी सोमवारी सकाळी बैठक घेऊन याबाबतचे धोरण ठरविणार आहोत. राष्ट्रवादीशी अद्याप बोलणे झाले नसले, तरी आम्ही हा विषय ताकदीने लावून धरणार असल्याचे विखे म्हणाले.

Tags : mumbai, convention,  last week,  today, mumbai news


  •