Wed, May 22, 2019 22:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › KEMच्या नामांतरावरून सेना-मनसे आमने सामने

KEMच्या नामांतरावरून सेना-मनसे आमने सामने

Published On: Mar 25 2018 2:17AM | Last Updated: Mar 25 2018 2:17AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील ऐतिहासिक ठिकाणांना ब्रिटीशांची दिलेली नावे बदलून त्याला भारतीय नावे देण्याची मुळ संकल्पना शिवसेनेचीच असल्याचे सांगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातवे राजा एडवर्ड स्मारक रूग्णालय अर्थात केईएम हॉस्पिटलचे नाव बदलून डॉ. आनंदी जोशी यांचे नाव देण्याच्या मागणीला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. एवढेच नाही तर, या या मागणीवर शिवसेना विचार करून नाव बदलायचे की नाही, याबाबत निर्णय घेईल, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे नामकरणावरून शिवसेना-मनसेत वाद होण्याची शक्यता आहे. 

केईएम हॉस्पिटलचा सुमारे 9 दशकाचा इतिहास आहे. हे हॉस्पिटल केईएम नावाने मुंबईकरांच्याच नाही तर देश-विदेशी लोकांच्या परिचयाचे आहे. त्यामुळे या प्रचलित नावाला काहींचा विरोध तर, काहींचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अचानक मनसेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र लिहून केईएम हॉस्पिटलचे डॉ. आनंदी जोशी असे नामकरण करण्याची मागणी केली. याबाबत महापौरांना विचारले असता, आपल्या हातात अजून मागणीचे पत्र पडलेले नाही. शुक्रवारी मनसेने महापालिका मुख्यालयातील आपल्या कार्यालयात हे पत्र दिल्याचे समजले. सोमवारी हे पत्र हातात, मिळाल्यानंतरच यावर भाष्य करणे संयुक्तीक ठरेल, असे मत महापौरांनी व्यक्त केले. परंतू पालिकेतील शिवसेना पक्षाचे प्रमुख या नात्याने सभागृह नेते यशवंत जाधव यांना या मागणीबद्दल विचारले असता, त्यांनी केईएम हॉस्पिटलचे नाव बदलण्यासंदर्भात विचार करून निर्णय घेऊ असे सांगितले. 

मुंबईतील व्हिटी (व्हिक्टोरिया टर्मिनस) स्टेशन, एलफिन्स्टन, सॅण्डहर्स्ट रोड, बॉम्बे हायकोर्ट व अन्य इंग्रजी नावे बदलण्याची मुळ संकल्पना शिवसेनेची आहे. शहरातील रस्ते, चौक, उद्यान, रेल्वे स्टेशन, विमानतळ व अन्य सार्वजनिक स्थळांना भारतीय नावे देण्याचा ठरावही पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. पण केईएम हॉस्पिटलचे नाव बदलायचे की नाही, याबाबत अभ्यास करणे आवश्यक आहे. कोणी मागणी केली, म्हणून ते नाव त्वरीत बदलणे शक्य नसते. यासाठी कायदेशिर प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही यशवंत जाधव यांनी सांगितले. त्यामुळे केईएम हॉस्पिटलच्या नाव बदलीच्या मागणीवरून शिवसेना-मनसेत मतभेद होण्याची दाट शक्यता आहे.

‘केईएम’चा थोडक्यात इतिहास

मुंबईतील लोकसंख्या वाढत गेल्यामुळे शहरात वैद्यकीय सुविधेची गरज भासू लागली. त्यानंतर मुंबईत कामा हॉस्पिटलची निर्मिती झाली. पण शहराचा कारभार सांभाळणार्‍या पालिकेचे मुंबईत एकही हॉस्पिटल नसल्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ लागली. दरम्यानच्या काळात मुंबईतील व्यापारी शेठ गोवर्धनदास सुंदरदास यांच्या भरघोस देणगीतून 1925 मध्ये महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय परळ येथे सुरू झाले. त्याला जोडूनच हॉस्पिटल बांधण्यात आले. त्यावेळी ब्रिटिश राजवट असल्यामुळे या हॉस्पिटलचे सातवे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम) असे नामकरण करण्यात आले. पण या हॉस्पिटलवर भारतीयांचेच वर्चस्व होते. या संस्थेची स्थापना होईपर्यंत सर्व प्रस्थापित हॉस्पिटलमध्ये व आरोग्य सेवेत अँग्लो इंडियन व्यावसायिकांचा भरणा होता. 

हे हॉस्पिटल भारतीयांना पेलेल की नाही असा प्रश्न होता. मात्र सेवा, शिक्षण व संशोधन या ध्येयांनी प्रेरित होऊन संपूर्ण भारतीयांनी चालवलेल्या या हॉस्पिटलचा काही काळात कायापालट झाला. अल्पावधीत वैद्यकीय शिक्षण व हॉस्पिटलमधील अत्याधुनिक रूग्ण सेवेत केईएम हॉस्पिटलने स्वत:चा ठसा उमटवला आहे. 1 हजार 800 खाटांचे हे हॉस्टिटल असले तरी, येथे 2 हजार 200 रूग्णांवर आंतररूग्ण विभागात उपचार केले जातात. त्याशिवाय दररोज 2 हजाराहून जास्त रूग्णांचे बाह्य रूग्ण विभागात उपचार केले जात आहेत.  

भारतील वैद्यकीय क्षेत्रातील पहिले हद्यरोपण, पहिली टेस्ट ट्युब बेबी, पहिला लिपोसम ड्रग, पहिली रोबोटिक लॅप्रोस्कोपिक बालशल्य चिकित्सा, संपूर्ण जुळ्या अर्भकांना वेगळे करणे यासारख्या उपचार पध्दती अंमलात आणल्या. देशातील दहा अग्रेसर वैद्यकीय महाविद्यालयात गोवर्धनदास सुंदरलाल वैद्यकीय महाविद्यालयाची गणना होते. 

Tags : mumbai, KEM names, Sena MNS, face to face, mumbai news