Sun, Mar 24, 2019 12:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्यापासून माटुंगा रोड स्थानक महिलांच्या हाती

उद्यापासून माटुंगा रोड स्थानक महिलांच्या हाती

Published On: Mar 07 2018 2:09AM | Last Updated: Mar 07 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वे महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे. माटुंगा रोड रेल्वे स्थानकाचे कामकाज आणि देखभाल संपूर्णपणे महिला कर्मचार्‍यांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सूचनेप्रमाणे रेल्वे मंडळांनी महिला विशेष स्थानकासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. या धर्तीवर पश्चिम रेल्वेने महिला विशेष स्थानकासाठी माटुंगा रोड स्थानकाची निवड केली. या स्थानकात दोन फलाट आहेत. स्थानकात तिकीट तपासनीस, बुकिंग अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानक सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी अशा सर्व ठिकाणी महिला कर्मचारी नियुक्ती पूर्ण झाली आहे. संबंधित महिला अधिकारी आणि कर्मचार्‍यांना 8 मार्चपासून स्थानकाचा ताबा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

जागतिक महिला दिनापासून माटुंगा रोड हे स्थानक महिला विशेष स्थानक म्हणून कार्यान्वित होईल. सद्यस्थितीत स्थानकात 1 स्थानक व्यवस्थापक, 3 तिकीट तपासनीस, 5 ते 6 रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी, बुकिंग कार्यालयात कार्यरत असणारे सुमारे 12 ते 13 कर्मचारी आणि 2 ते 3 स्वच्छता कर्मचारी असे एकूण 25 कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांकडून माटुंगा रोड स्थानकाची देखभाल केली जाते, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी सांगितले.