Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जूनपासून नवी मुंबई ते मुंबई एसी फेरीबोट 

जूनपासून नवी मुंबई ते मुंबई एसी फेरीबोट 

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 2:18AMनवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबईच्या रहिवाशांना येत्या जून महिन्यापासून दक्षिण मुंबईत एसी फेरीबोटीने प्रवास करता येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अशाप्रकारच्या दोन फेरीबोटी सुरू केल्या जाणार आहेत. दक्षिण मुंबईत गेट वे ऑफ इंडिया आणि भाऊ चा धक्‍का अशा दोन ठिकाणांहून या फेरीबोटी सुटतील. प्रत्येक फेरीबोटीत किमान 60 प्रवासी असतील. मात्र, या सेवेचे वेळापत्रक अजून ठरवण्यात आलेले नाही, अशी माहिती संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्‍त रामास्वामी स्वत: शहरातील विविध जेटींना भेट देऊन तेथून अशाप्रकारची बोटसेवा सुरू करता येईल का, याची पाहणी करणार आहेत. सध्या शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. त्यानिमित्ताने विविध जेटींना भेटी देऊन तेथील सद्यस्थितीचा अहवाल तयार केला जाईल. ठरलेल्या सर्व गोष्टी नियोजनानुसार पार पडल्या तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सेवा  सुरू होईल. 

नवी मुंबई परिसरातून दररोज हजारो नागरिक दक्षिण मुंबईत प्रवास करतात. त्यांनी जर बोटीने प्रवास केला तर लोकलपेक्षा कमी वेळात दक्षिण मुंबईत पोहोचता येईल. अशाप्रकारची बोटसेवा नवी मुंबईतील वाशी आणि सीबीडी बेलापूर येथून सुरू करण्याचा विचार आहे. यासाठी महापालिका आणि सिडकोने विकसित केलेल्या जेटी वापरल्या जातील, असेही सूत्रांनी सांगितले.

याशिवाय आम्ही विकसित न केलेल्या जेटींचाही या सेवेसाठी विचार होऊ शकतो. मात्र, बोटसेवा प्रकल्प हा महापालिकेचाच असेल. अशा प्रत्येक बोटीची किंमत सुमारे 2 ते 3 कोटी रुपये असेल. तर या एकूणच बोटसेवा प्रकल्पासाठी  महापालिकेने 10 कोटींची तरतूद केली आहे, असेही सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून गेल्या जुलैमध्येच ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याचेही सूत्रांनी सांगितले. तर यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते कौशिक जोशी म्हणाले की, केवळ दोन बोटी पुरेशा ठरणार नाहीत. सेवा सुरू झाल्यावर लगेचच अशा बोटी वाढवायला हव्यात. यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत. दरम्यान, या एकूणच वृत्ताबाबत पालिका आयुक्‍त रामस्वामी एन. यांनी मात्र अधिकृत दुजोरा दिलेला नाही.