Wed, Jun 26, 2019 17:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत उभे राहणारा राज्यातील पहिले मराठीचे विद्यापीठ

मुंबईत उभे राहणारा राज्यातील पहिले मराठीचे विद्यापीठ

Published On: Feb 26 2018 1:44PM | Last Updated: Feb 26 2018 1:44PMमुंबई: पुढारी प्रतिनिधी

वाचक चळवळ म्हणून ओळखली जाणा-या ग्रंथालीच्या पुढाकाराने मराठी भाषेचे राज्यातील पहिले विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक असणारी जागा मिळवून देण्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना यश आले आहे. उद्या (27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिना निमित्त मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते या जागेचा हस्तांतरनाचा औपचारिक कार्यक्रम विधानभवनात होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जागेत आणि ग्रंथालीच्या पुढाकाराने हे विद्यापीठ उभे राहणार असून आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात हे सुरू व्हावे म्हणून आमदार आशिष शेलार या विषयाचा गेली दीड वर्षे पाठपुरवा करीत होते. वांद्रे येथील उच्च वस्तीत अखेर बॅंडस्टॅंन्ड येथील जागा महापालिकेने विद्यापीठाला देण्याचे मान्य केले.  त्याचे अधिकृत पत्र उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथालीला दिले जाणार आहे. ग्रंथालीचे सहसंस्थापक दिनकर गांगल यांच्या  सह ग्रंथालीचे अन्य पदाधिकारी, आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे.

राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे ही मागणी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून केली जात आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेक वेळा करण्यात आली. परंतु, गेल्या साठ वर्षात त्याला मुर्त स्वरूप आले नव्हते.

राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर ग्रंथालीने अशा प्रकारे अभिमत विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस आमदार आशिष शेलार यांच्याकडे व्यक्त केला. त्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्ह‍णून विनंती केली. या विद्यापीठाची वांद्रे येथे उभारणी व्हावी म्ह‍णून आमदार आशिष शेलार यांनी पुढाकार घेतला व महापालिकेकडे जागेची मागणी केली. महापालिकेने त्या‍साठी जागा देण्याची मागणी मान्य केले आहे.

दरम्यान, हे राज्यातील पहिले मराठीचे विद्यापीठ आहे. त्यामुळे त्यांची वैशिष्ठ पुर्ण रचना व्हावी तसेच त्यामध्ये भाषेसाठी पोषक उपक्रम कोणते व कसे असावेत याबाबतची रचना याचे नियोजन सुरू असून जागा ताब्या‍त आल्यानंतर पुढील कामांना प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे.

कसे असेल विद्यापीठ

मराठी भाषेतील सर्व ग्रंथ व पुस्तकांनी सुज्जस असे अद्यावत ग्रंथालय यामध्ये असेल. तसेच मराठी भाषेच्या संवर्धन व प्रचारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. परीक्षा, संशोधन,लेखन प्रोत्साहन असे मराठी भाषेचे उपक्रम या विद्यापीठामार्फत राबविण्यात येतील.

अन्य भाषांची विद्यापीठे पण मराठीचे विद्यापीठच नाही

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आजवर तमीळ (२००४) संस्कृत (२००५ ), तेलुगू व कन्नड (२००८), मल्याळम (२०१३ ) आणि ओडिया (२०१४ ) या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला असून त्यांपैकी तमीळ (१९८१ ),तेलुगू (१९८५ ), कन्नड (१९९१ ), मल्याळम (२०१२ ) या भाषांची आपापल्या राज्यांत स्वतंत्र विद्यापीठे आहेत. संस्कृत भाषेचीही केंद्रीय,अभिमत आणि खासगी अशी अनेक विद्यापीठे देशाच्या वेगवेगळ्या भागांत कार्यरत आहेत. शिवाय ऊर्दू, हिंदी आणि इंग्रजीसह परकीय भाषांसाठी केंद्रीय विद्यापीठे आहेत. मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठ (१९९८ ) हे हैद्राबादला आहे, तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय (१९९७ ) महाराष्ट्रात वर्धा येथे आहे. मात्र मराठीचे विद्यापीठ नव्हते.