Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेसबुकद्वारे मैत्री करत दरोडा घालणार्‍या टोळीचा पर्दाफाश : तिघांना अटक

फेसबुकद्वारे मैत्री करत दरोडा घालणार्‍या टोळीचा पर्दाफाश : तिघांना अटक

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:38AMमुंबई : प्रतिनिधी

फेसबूकच्या माध्यमातून मैत्री करत भेटण्यासाठी बोलावून दरोडा घालणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेला यश आले आहे. अशाप्रकारे गोवंडीतील एका तरुणाला लुटल्याप्रकरणी गुन्हे शाखेने तीन जणांना बेड्या ठोकल्या असून टोळीतील आणखी तिघांचा शोध सुरू केला आहे.

गोवंडीतील इंडीयन ऑईलनगर परिसरात एका तरुणाला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड आणि क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करुन त्याच्याजवळील 5 लाख 92 हजारांचा ऐवज लुटल्याची घटना 16 जानेवारीला घडली. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या देवनार पोलिसांनी जखमी तरुणाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखा पथकाने केलेल्या तपासात याप्रकरणातील पीडित तरुणाला एका मुलीने घटनास्थळी भेटण्यासाठी बोलावून घेतल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली. या मुलीने 8 जानेवारीला या तरुणासोबत फेसबूकच्या माध्यमातून ओळख करुन घेतली  होती. ओळखीतून मेैत्री वाढवत या मुलीने तरुणाला 16 जानेवारीला इंडीयन ऑईलजवळ भेटायला बोलावले. हा तरुण तेथे पोहोचताच पाच ते सहा जणांनी त्याला घेरुन बॅट आणि लोखंडी रॉडने मारहाण करत अंगावरील 5 लाख 92 हजार रुपये किंमतीचे दागिने घेवून पळ काढल्याचे तपासात उघड झाले.

गुन्ह्यातील तीन आरोपी शिवाजीनगर, पांजरपोळ येथे येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. तिघांनाही पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत, आणखी तीन जणांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले. अटक करण्यात आलेल्या तिनही आरोपींना देवनार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम वाढवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.