Sun, Mar 24, 2019 10:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोशल मीडियावरची मैत्री पडली महाग

सोशल मीडियावरची मैत्री पडली महाग

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 21 2018 12:54AMठाणे : प्रतिनिधी

सोशल मीडियावरून झालेल्या मैत्रीनंतर लग्नाचे आमिष दाखवत एका ठगाने 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करीत तिला वारंवार धमकवत 4 लाख 87 हजार रुपये लुबाडून पोबारा केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. अनिराज कुमार पांडे असे ठगाचे नाव असून त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठाणे पूर्वेकडील कोपरी भागात राहणार्‍या 30 वर्षीय विवाहित महिलेला काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरून अनिराज कुमार पांडे नामक व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. सदर रिक्वेस्ट महिलेने स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले आणि दोघांनी एकमेकांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर देखील एकमेकांना दिले. याच दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली व अनिराज याने सदर महिलेसोबत लग्न करणार असल्याचे आश्‍वासन तिला दिले आणि 2 मे 2018 रोजी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. 

पीडित महिलेशी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तिला वारंवार धमकावून तिच्याकडून पैशांची मागणी हा ठग करू लागला. भयभीत झालेल्या महिलेने या ठगास 4 लाख 87 हजार रुपये दिले. मात्र त्यानंतर या ठगाने पोबारा केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने अखेर याप्रकरणी 19 जुलै रोजी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे. या घटनेचा महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जगताप अधिक तपास करीत आहेत.