Mon, Apr 22, 2019 03:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मित्रांनी १५ लाखांचा गंडा घातल्याने तरुणाची आत्महत्या

15 लाखांना पैशांचा पाऊस पाडणारे घुबड; तरुणाची आत्महत्या!

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:47AMबदलापूर : वार्ताहर

पैशांचा पाऊस पाडणारे घुबड देण्याची बतावणी करून त्रिकुटाने एका तरुणाला 15 लाखांचा गंडा घातला. तसेच ब्लॅक मॅजिक करत असल्याची पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देवून  मारहाण केल्याने या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात समोर आली आहे. सुनील शिंदे (25) असे या तरुणाचे नाव असून, तो  बदलापुरातील खरवई भागात राहत होता.

आत्महत्येनंतर त्याने लिहून ठेवलेली एक चिट्ठी कुटुंबियांच्या हाती लागल्याने हा प्रकार उघड झाला.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलला त्याचे उल्हासनगरला राहणारे आकाश, संजय व किरण या तीन मित्रांनी बारा नखांचे घुबड असून त्यामुळे पैशांचा पाऊस पडतो, अशी बतावणी केली होती. या घुबडासाठी मागील तीन वर्षांपासून सुनीलने त्यांना वेळोवेळी 15 लाख रुपये दिले होते. परंतु तरीही हे घुबड न मिळाल्याने सुनीलने मित्रांकडे पैसे परत मागितले. त्यावर त्याच्या मित्रांनी तू ब्लॅक मॅजिक करतो, पोलिसांत तक्रार करू, अशी दमदाटी केली. तसेच मारहाणही केली. त्यानंतर सुनीलने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी सुनीलच्या भावाने केलेल्या फिर्यादीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आकाश, संजय व किरण या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.