होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पैशाच्या वादातूनच मित्राची हत्या

पैशाच्या वादातूनच मित्राची हत्या

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 06 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी

तीन दिवसांपूर्वी खार येथे एका 25 वर्षांच्या तरुणाची हत्या झाली होती. त्या हत्येतील मारेकर्‍याला पकडण्यात अखेर खार पोलिसांना यश आले. हत्येनंतर सोलापूर येथे पळून गेलेल्या या आरोपीचे नाव रोहित श्रावण अंबोरे (20) असे आहे. पैशांवरुन झालेल्या वादातून रोहितने त्याचा मित्र बलदिप ऊर्फ नारायण मुलचंद गुप्ता (25) याची हत्या केल्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले. याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सोमवारी सकाळी खार येथील समुद्रकिनार्‍याजवळील नौशाद इमारतीसमोरील तिवरांच्या झाडाच्या आतमध्ये एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर खार पोलिसांनी तिथे धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.  मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. मृत तरुणाची ओळख पटली नव्हती. नंतर पोलिसांना मृत तरुणाचे नाव बलदिप गुप्ता असून तो मित्रांसोबत भायखळा परिसरात राहत होता. कॅटरिंगचे काम करणार्‍या रोहित अंबोरे या तरुणासोबत त्याचे काही दिवसांपूर्वीच भांडण झाले होते. 

या माहितीनंतर हत्येच्या दिवसापासून पळून गेलेल्या रोहितचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. रोहित हा मूळचा नाशिकचा रहिवाशी होता. मात्र हत्येनंतर तो पुण्याला निघून गेल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे खार पोलिसांचे एक विशेष पथक पुण्याला गेले होते.  याच पथकाला तो सोलापूर येथे गेल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकाने सोलापूर गाठले. तिथे लपून बसलेल्या रोहितला गुरुवारी अटक करण्यात आली.