Wed, Apr 24, 2019 21:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईसाठी स्वतंत्र वाहतूक प्राधिकरण

मुंबईसाठी स्वतंत्र वाहतूक प्राधिकरण

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 1:41AMमुंबई : चंदन शिरवाळे

मुंबईकरांची पोटापाण्यासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी या शहरातील मेट्रो, बेस्ट, रेल्वे, टॅक्सी आणि रिक्षा सेवांसाठी एकच स्वतंत्र प्राधिकरण आणि उपनगरांतून शहरात येणार्‍या वाहनांसाठी गेटवे ऑफ इंडियालगत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर भव्य वाहनतळ उभारण्याची शिफारस सरकारच्याच एका शिष्टमंडळाने सामान्य प्रशासन विभागाला केली आहे. 

सेऊल आणि सिंगापूरमधील सार्वजनिक वाहतूक सेवेचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून विविध विभागांचे 26 अधिकारी गेले होते. त्यामध्ये समावेश असलेल्या मुंबईतील 3 शासकीय अधिकार्‍यांनी ही शिफारस केली आहे.गुरुवारी याबाबतचा अहवाल त्यांनी सादर केला आहे. मुंबईकरांसह ठाणे, नवी मुंबई, कर्जत, कसारा आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील डहाणुपासुन येणारे हजारो चाकरमनी दररोज विविध साधनांच्या माध्यमातुन या शहरात प्रवास करतात. मुंबईच्या वेशीमध्ये आल्यानंतर यामधील 70 टक्के प्रवाशांना आपआपल्या आस्थापना गाठण्यासाठी उलटसुलट प्रवास करावा लागतो. वाहनचालक इच्छितस्थळी येण्यास सहसा तयार होत नसल्याने वाहने बदलण्यात प्रवाशांचा वेळ वाया जातो. एखाद्या मार्गावर वाहतुक कोंडी किंवा प्रवाशांची संख्या वाढल्याचा गैरफायदा घेत ते जादा भाडे आकारतात.  परंतु प्रत्येकाचे नियम स्वतंत्र असल्यामुळे कारवाई करणे अवघड जाते. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुक सेवांसाठी आता एकच स्वतंत्र प्राधिकरण स्थापन्याची शिफारस या अधिकार्‍याने केली आहे.  वाहतुकीच्या साधनानुसार तिकीटाचा दर निश्‍चित न करता प्रवासाच्या अंतरावर भाडे आकारावे, अशी सुचनाही त्यांनी केली आहे.

रेल्वेमधील प्रचंड गर्दी टाळण्यासाठी अनेकजण खाजगी वाहने आणतात. त्यामुळे मंत्रालय, नरीमन पॉइंट, फोर्ट व कुलाबा परिसरात प्रचंड वाहतुक कोंडी होती. ती टाळण्यासाठी गेट ऑफ इंडियालगत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमीनीवर भव्य वाहनतळ उभारल्यास या वाहनांना तेथे पार्कींग उपलब्ध होईल. तेथुन मेट्रोमार्गे हे प्रवासी आपल्या इच्छित जातील.रेल्वेस्थानकांलगत सायकल उपलब्ध केल्यास तिचा वापर प्रवासी करु शकतात. यामुळे इंधन बचत आणि वाहतुक कोंडीतुन शहराची सुटका होऊ शकेल, असा विश्‍वासही या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (एमएमआरडीए) मध्यवर्ती वाहतुक यंत्रणा, बसेससाठी स्वतंत्र मार्गिका, रस्त्यांलगत सार्वजनिक शौचालये आणि दहा वर्षानंतर वाहने मोडीत काढल्यास वाहनांच्या संख्येवर आळा घालता येईल. एमएमआरडीए क्षेत्रात एकच बससेवा, रुग्णालये, हाऊसिंग सोसायट्या, हॉटेलमध्ये सार्वजनिक पार्कींग सुविधा,वाहतुकीचे नियम मोडल्यास जादा दंड, नवीन रस्ते व उड्डाणपुल उभारल्यास मुंबईच्या परिसरातील रहीवाशांचा प्रवास सुखकर होईल, असेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

Tags : Mumbai, Free, Transport, Authority,  Mumbai