Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील सार्वजनिक शौचालये मोफत

मुंबईतील सार्वजनिक शौचालये मोफत

Published On: Feb 03 2018 2:42AM | Last Updated: Feb 03 2018 2:40AMमुंबई : प्रतिनिधी 

पैसे भरा व वापरा शौचालयाच्या संस्थांकडून मुंबईकरांची होणारी पिळवणूक लक्षात घेऊन ही योजना बंद करून ती शौचालये नि:शुल्क उपलब्ध करून देण्याची घोषणा शुक्रवारी पालिका आयुक्तांनी केली. त्यामुळे  सार्वजनिक शौचालयात मागण्यात येणारे शुल्क मुंबईकरांना भरावे लागणार नाही. 

   पैसे भरा व वापरा शौचालयामध्ये मर्यादित प्रवेश व या योजनेत मुंबईकरांकडून पैसे उकळण्यात येत आहेत. मुंबईकरांना भेडसावणार्‍या या समस्या लक्षात घेऊन, ही योजना बंद करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी सार्वजनिक शौचालये नि:शुल्क वापरायला मिळणार असल्याचे पालिका आयुक्तांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केले. ही शौचालये ताब्यात घेऊन पालिका स्वखर्चाने ती दुरूस्त अथवा नव्याने बांधणार आहे. यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शौचालयांत आधुनिक दर्जोन्‍नत सुविधा पुरवण्यात येणार आहेत. ही शौचालये खाजगी संस्थेमार्फत चालवण्यात येतील. पण यासाठी या संस्था जनतेकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही. पण शौचालयाची डागडुजी व साफसफाई संस्थांना ठेवता यावी, यासाठी त्यांना रोषणाईयुक्त जाहिरातीचा हक्क बहाल करण्यात येणार असल्याचेही पालिका आयुक्तांनी यावेळी जाहीर केले. 

दरम्यान वस्ती स्वच्छ या कार्यक्रमाअंतर्गत धोकादायक शौचालये पाडून तेथे नवीन शौचालये उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या शौचालयांमध्ये एकमजली व दुमजली शौचालयांचा समावेश राहणार आहे. अशाप्रकारे आरसीसी बांधकामाच्या या शौचालयांमध्ये  20 हजार शौचकुपे बसवण्यात येणार आहेत. तीन वर्षात हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.