Thu, May 28, 2020 13:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोंडी टाळण्यासाठी मोफत ‘बेस्ट’ सेवा

कोंडी टाळण्यासाठी मोफत ‘बेस्ट’ सेवा

Published On: Jun 13 2019 1:35AM | Last Updated: Jun 13 2019 1:12AM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठराविक गर्दीच्या ठिकाणी पाच किलोमीटरपर्यंत मुंबईकरांना मोफत बेस्ट सेवा पुरवण्याचा निर्णय बुधवारी सरकारने घेतला आहे. वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नावर वर्षा निवासस्थानी झालेल्या तातडीच्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मुंबई मनपा आयुक्तांना धोकादायक उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत आधुनिक तंत्रज्ञान आणि अ‍ॅपच्या मदतीने मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई मनपाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 29 उड्डाणपूल धोकादायक आढळल्याने ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. आधीच मेट्रोचे काम  त्यात पावसात पाणी भरल्यामुळे मुंबईतील वाहतुकीचा बोजवारा उडतो. अशा परिस्थितीत 29 उड्डाणपूल बंद केल्यास मुंबईतील वाहतूक ठप्प पडण्याची भीती निर्माण झाली होती. परिणामी, मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी बुधवारी संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसह चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीस मुख्यमंत्र्यांसोबत मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, मध्य रेल्वेचे मंडल महाप्रबंधक संजयकुमार जैन, पश्‍चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिल गुहा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशीष शेलार, राज पुरोहित, अमीत साटम यांच्यासह वरीष्ठ अधिकारी, मुख्य अभियंता उपस्थित होते.

चर्चेमध्ये मुंबईत बांधण्यात येणारे पादचारी, वाहतूक आणि  रेल्वे पुलांचे आयुष्यमान दीर्घकालीन असावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक बांधकाम व तंत्रज्ञानाचा वापर करावा. सध्या ज्या भागातील पूल, रस्ते वाहतुकीस बंद आहेत, त्याबाबत व पर्यायी मार्गांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

उड्डाणपूल सुरू ठेवण्यासाठी व्हीजेटीआयची मदत घेणार

मुंबई मनपाने जे उड्डाणपूल धोकादायक ठरवत तत्काळ तोडण्याचे आदेश दिले आहेत, त्या उड्डाणपुलांवर काँक्रिट ओव्हरले या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किमान हलक्या वाहनांना पावसाळा संपेपर्यंत प्रवेश सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी महिन्याभराचा वेळ लागणार असून एका उड्डाणपुलासाठी किमान 15 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

अ‍ॅप देणार कोंडी व बंद रस्त्यांची माहिती

सध्या मुंबईतील जे रस्ते, पूल नागरीकांसाठी बंद करण्यात आले आहेत, त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष अ‍ॅप गुगलच्या मदतीने तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने दुरूस्तीमुळे ज्या पुलावरून अथवा रस्त्यांवरून वाहतूक वळविण्यात आली आहे, त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येईल. याशिवाय जागोजागी मार्गदर्शक फलक लावावेत व पुलाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार? याबाबत माहिती फलक लावून नागरिकांना माहिती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

घाटकोपर, जुहू तारा रोड उड्डाणपूल खुले करणार

घाटकोपर आणि जुहू तारा रोड या दोन पुलांची आयआयटी आणि व्हीजेटीआयमार्फत पुनर्तपासणी करण्यात आली असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. त्यानंतर हे दोन्ही पूल वाहतुकीस खुले केले जातील, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मनपा आयुक्तांना म्हणून विशेषाधिकार

विविध सरकारी परवानग्या मिळवताना उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीसाठी विलंब होत असल्याचे चर्चेत समोर आले. त्यामुळे लालफितीचा फटका टाळत धोकादायक उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करताना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मनपा आयुक्तांना विशेषाधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून मनपा हद्दीतील उड्डाणपुलांची पुनर्बांधणी तातडीने करता येईल.