Fri, Jan 18, 2019 01:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे सिव्हिल रुग्णालयात चार वाहनांना आग

ठाणे सिव्हिल रुग्णालयात चार वाहनांना आग

Published On: Jan 29 2018 1:30AM | Last Updated: Jan 29 2018 12:48AMठाणे : प्रतिनिधी 

ठाणे सिव्हील रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच याच रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या चार वाहनांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत चारही वाहने जळून खाक झाले. जळालेल्या वाहनांमध्ये एका टाटा सुमोसह तीन रुग्णवाहिका होत्या. हॉस्पिटल परिसरात कचरा जाळल्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने 3 फायर इंजिन व एका बचाव वाहनांसह घटनास्थळी धाव घेवून ही आग आटोक्यात आणली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटल आवारात उभ्या असलेल्या बंद अवस्थेतील काही वाहनांमध्ये अचानक आग लागली. जिल्हा शासकीय रुग्णालय असून देखील या रुग्णालयात आग विजवण्यासाठी प्राथमिक यंत्रणाच नसल्याने अग्निशामक दलाचे पथक येतर्यंत आग वाढली. ही आग एका वाहनातून दुसर्‍या वाहनात पसरत जावून एका टाटा सुमोसह तीन रुग्णवाहिका आगीच्या जाळ्यात आल्या. 

सुट्टीचा दिवस असल्याने या रुग्णालयात जा- ये करणार्‍या नागरिकांची वर्दळ कमी असल्याने तसेच आजूबाजूला नागरिक नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेे नसले तरी ही आग परिसरात लावलेल्या कचर्‍याच्या आगीमुळे भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

रुग्णालयात ठेवण्यासाठी जागा नसल्याने या रुग्णवाहिका हलविण्यासाठी उपसंचालक कार्यालयात यापूर्वी अनेकवेळा पत्रव्यवहार केल्याची माहिती ठाणे जिल्हा अतिरिक्त शल्य चिकिस्तक डॉ. एस.व्ही. माकोडे यांनी दिली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.