होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादरमध्ये झाड पडून एकाच कुटुंबातील ४ जखमी

दादरमध्ये झाड पडून एकाच कुटुंबातील ४ जखमी

Published On: Jun 11 2018 1:34AM | Last Updated: Jun 11 2018 1:00AMमाटुंगा : वार्ताहर

झाड पडून एका 13 वर्षीय मुलीचा दहिसरमध्ये मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दादर शिवसेना भवनाजवळ एकाच कुटुंबातील चौघेजण अंगावर झाड पडून जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.  ही घटना शनिवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली.

शिवाजी पार्क येथे राहणारे राऊत कुटुंबीय प्लाझा थिएटरहुन सिनेमा पाहून घरी परतत असताना राम मारुती रोडवर हिरण्या बिल्डिंगसमोरील झाड कोसळले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच असलेल्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अच्युतम राऊत (54), त्यांच्या पत्नी, मुलगी अधिश्री राऊत (10) किरकोळ जखमी असून त्यांना औषधोपचार करून सोडण्यात आले. तर   पुतणी श्रेया राऊत (20) गंभीर असून तिच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटने बाबत अच्युतम राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही सुदैवाने वाचलो अशी प्रतिक्रिया दिली, प्लाझा थिएटरला संध्याकाळी 6 ते 9 चा शो आम्ही पहिला रात्रीचे नऊ वाजून गेले होते व आम्ही जवळपास राहत असल्याने पाई चालने योग्य समजले व जसे आम्ही दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या आवारातून पुढे जात होतो तो वर आम्हा चौघांवर झाड कोसळले सुदैवाने आम्ही तिघे किरकोळ जखमी आहोत पण माझी पुतणी मात्र बर्‍यापैकी जखमी झाली असून तिचे हिंदुजा हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन होणार आहे खो-खो खेळाडू असलेल्या आपल्या पुतणीच्या कमरेला जबर मार बसल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती अच्युतम राऊत यांनी दिली.  दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांगली झाडे देखील पालिकेकडून तोडण्यात येत आहेत. पालिकेच्या वृक्षछाटणीला राऊत यांनी विरोध दर्शवला.