Tue, Jul 23, 2019 02:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात मेट्रोमुळे चार पादचारी पूल अडचणीत 

ठाण्यात मेट्रोमुळे चार पादचारी पूल अडचणीत 

Published On: Feb 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 01 2018 1:22AMठाणे : प्रतिनिधी 

घोडबंदर रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि पादचार्‍यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या चार पादचारी पुलांचे काम ठाणे महापालिकेला काही काळ सुरू करता येणार नाही. घोडबंदरहून जाणार्‍या भविष्यातील मेट्रोला या पादचारी पुलाचा अडथळा निर्माण होऊ शकतो अशी शंका एमएमआरडीएच्या वतीने उपस्थित करण्यात आली आहे. 

जोपर्यंत मेट्रोचा आराखडा येत नाही तोपर्यंत या पुलाचे काम सुरू करू नये असे पत्रच  एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला दिले आहे. त्यामुळे जोपर्यंत एमएमआरडीए कडून महापालिकेला हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत महापालिकेला या पुलांचे काम सुरू करता येणार नसल्याने ठाणेकरांना विशेष करून घोडबंदर पट्ट्यातील नागरिकांना या चार पादचारी पुलांना मुकावे  लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

दोन पादचारी पुलांची कामे पूर्ण झाली असली तरी, आणखी चार पादचारी पूल प्रस्तावित करण्यात आले असून या पुलांचे काम देखील लवकरच सुरु करण्यात येणार होते. यामध्ये आनंदनगर, मूच्छाला कॉलेज, भाईंदर पाडा तसेच ओवळा अशा चार ठिकाणी पादचारी पुल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या कामासाठी 20 कोटींचा निधी प्रास्तवित करण्यात आला आहे. मात्र आता या पुलाच्या कामाला एमएमआरडीएनेच ब्रेक लावला असून या चारही पादचारी पुलांच्या कामाची प्रक्रिया काही काळ थांबवावी असे एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पत्र  दिले आहे. भविष्यात या मार्गावरून जाणार्‍या मेट्रोचा चौथ्या टप्प्याला हे पादचारी पूल अडथळा ठरू शकतात. 

मेट्रोच्या आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरु असून त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मेट्रोचा आराखडा तयार होत नाही तोपर्यंत महापालिकेला हे काम थांबवावे लागणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नसून निविदा प्रक्रिया देखील काढण्यात आलेली नाही. एमएमआरडीएकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले असून पुढील सूचना मिळेपर्यंत काम कामाची प्रक्रिया थांबवावी लागणार आहे अशी माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.