Thu, Apr 25, 2019 23:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'रायगडाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनविणार'

'रायगडाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनविणार'

Published On: Apr 08 2018 12:55PM | Last Updated: Apr 08 2018 12:55PMअनुभवी, तज्ज्ञ व ऐतिहासिक साहित्याच्या आधारे रायगडाच्या पुनर्निर्मितीचा शासनाचा संकल्प
शासनामार्फत प्रथमच सहाशे कोटी रुपयांची तरतूद
नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा अधिकार संसदेचा
अठरा महिन्यांच्या नियोजनबद्ध काळात प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न
पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडून किल्ले रायगडाची पाहणी

महाड : श्रीकृष्ण द.बाळ.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर किल्ले रायगडाच्या पुनर्निर्मितीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आग्रही आहेत. त्यांच्या प्रयत्नातून स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार असल्याचा संकल्प केंद्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याने सोडला आहे. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून खात्याचे मुंबई प्रभारी नंबी राजन यांनी काल, (दि.७) महाड येथे झालेल्या पत्रकारांच्या चर्चेदरम्यान ही माहिती दिली.

केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या यंत्रणेखाली रायगड प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या किल्ले रायगडावरील उत्खनना संदर्भात शुक्रवारी रात्री हॉटेल विसावा येथे या खात्याचे क्षेत्रीय निर्देशक नंबी राजन व पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक नेगी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रायगड प्रभारी कांबळे हेही उपस्थित होते.

पुरातत्त्व खात्याच्या इतिहासात शासनामार्फत आजपर्यंत पहिल्यांदाच सुमारे सहाशे कोटी रुपये एवढी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच ती प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडच्या निर्मितीसाठी खर्च होणार आहे. अनुभवी तज्‍ज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली अधिक साहित्यांचा वापर करून किल्ले रायगडाचे पुनर्वैभव निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे नंबी राजन यांनी यावेळी स्पष्ट केले .  

पुरातत्त्व खात्याच्या कायद्यानुसार किल्ले रायगडावर आजपर्यंत सुरू असलेली कामे यापुढे रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून शासनाच्या विविध खात्यांनी एकत्रितपणे करण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर कामांना वेग आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम, वीज मंडळ, पाणीपुरवठा, पर्यटन मंडळ आदी विभागांचा समावेश असल्याची माहिती नंबी राजन यांनी दिली.  

उत्खननासंदर्भात पुरातत्त्व खात्यामार्फत किल्ले रायगडावर तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये परिसरातील शासकीय तसेच निमशासकीय अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या गडावरील उत्खनन पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसारच होईल, असेही त्यांनी सांगितले . 

सध्या किल्ले रायगडावरील राजवाडा, नगारखाना, राणी महाल, जगदीश्वर मंदिर यांसह राष्ट्रमाता जिजाऊंच्या पाचाड येथील राजवाडय़ाच्या पुनर्निर्मिती करिता प्राधान्याने कामे हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली . 

महराष्‍ट्र शासनामार्फत निधी

महाराष्ट्र शासनामार्फत आजपर्यंत सर्वात जास्त निधीची तरतूद या किल्ल्याचा निर्मितीसाठी करण्यात आली. किल्ले रायगड हे एक देशात मॉडेल म्हणून निर्माण करणार आहे. त्यानंतर त्याचप्रमाणेच देशात इतर कामे केली जातील, अशी माहिती नेगी यांनी दिली. किल्ले रायगड हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक म्हणून निर्माण करण्याचा शासनाचा मनोदय असल्याचे सांगून त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या अठरा महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. मात्र, रायगडाची पुनर्निर्मिती हे एक आव्हान असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य करून हा नियोजनबद्ध काळातील प्रकल्प सर्व संबंधित यंत्रणांना सोबत घेऊन पूर्ण करू असे सांगितले .

किल्ले रायगडावर आतापर्यंत झालेले उत्खनन लक्षात घेता हे मराठा काळातील आहे. पुरातत्त्व खात्याच्या शंभर मीटर परिसरातील बांधकामाबाबत असलेल्या नियमांमध्ये शिथिलता आणण्याचे अधिकार संसदेला आहेत. या करिता आपण संबंधितांकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रायगड पाचाड परिसरामध्ये नव्याने झालेल्या बांधकामासंदर्भात बेकायदेशीर असलेल्या कामांना नोटिसा दिल्याची माहिती यावेळी रायगडचे प्रभारी कांबळे यांनी दिली.

उत्‍खननासाठी इस्रोची मदत घेणार

किल्ले रायगडावरील उत्खननासाठी इस्रो या संस्थेची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी गडावरील सर्व कामे पूर्ण करण्याकरता ए के सिन्हा यांसह आयआयटी संस्थेचे मेनन यांचे सहकार्य अनमोल आहे. तसेच रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या गडाच्या पुनर्निर्मितीचा घेतलेला ध्यास पाहता किल्ले रायगडाची पुननिर्मिती मुदतीत पूर्ण करण्याकरता सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे कांबळे सांगितले. रायगडावरील ऐतिहासिक कामांची पुनर्निर्मिती करण्यासाठी परिसरातील दगडांची तपासणी करूनच त्याचा वापर केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags : fort raigad, raigad, international standerd memorial, shivaji maharaj, sambhaji chhatrapati,