Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुकी सोनू मालाडच्या मागे पोलिस अधिकाऱ्याचा ब्रेन?

सोनू मालाडच्या मागे पोलिस अधिकाऱ्याचा ब्रेन?

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 9:08AMठाणे : दिलीप शिंदे

पोलीस खात्यातील गटबाजीच्या कलहातून काही पोलीस अधिकार्‍यांना त्रास देण्यासाठी कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जालान उर्फ सोनू मालाड याचा वापर काही अधिकार्‍यांकडून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याच सोनूने दोस्तीच्या नावाखाली मुंबईतील पोलीस अधिकार्‍यांना ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. सोनू मालाड याच्या पाठीमागे एका माजी पोलीस अधिकार्‍याचा ब्रेन असून तो अधिकारी कोण आहे? याचा शोध ठाणे पोलिसांकडून घेतला जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

आयपीएलमधील क्रिकेटचे सामने फिक्स करून सट्टा लावणारा बुकी सोनू योगेंद्र जालान उर्फ सोनू मालाड हा दाऊद इब्राहिम याच्या डी गँगसाठी काम करीत असून तो सट्ट्याची वसुली करण्यासाठी गँगस्टर रवी पुजारी याची मदत घेत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या आरोपीला मोक्‍का लावण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

डोंबिवली पूर्व येथील शांती सदन येथील दुकानात छापा टाकून सट्टेबाज गौतम सावला (43), नितीन पुंजानी (28), निखिल संपत (53) आणि कुशल खिमजी (41) आदी बुकींना 16 मेरोजी अटक झाली होती. त्यांना सोनूने सॉफ्टवेअर पुरविले होते. बेट अँड टेक नावाचे सॉफ्टवेअर सट्टेबाजांमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याचा वापर भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जातो. इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात मुंबई इंडियन्स व किंग्ज इलेव्हन पंजाब दरम्यान वानखेडे स्टेडियमवर सट्टेबाजी केल्याप्रकरणी त्यांना पकडले गेले होते. त्यानंतर आणखी एक बुकी विराजेश जोशी (27) याला अटक झाली. तर कांदिवलीत राहणारा सोनू जालान या मुख्य आरोपीला 29 मेरोजी ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आणि धक्कादायक खुलासे झाले. 

या 42 वर्षीय बुकीने यंदाच्या आयपीएलमध्ये 10कोटी रुपये कमावले आहेत. 2012 ध्ये मुंबई पोलिसांनी त्याला आयपीएल सामन्यावर सट्टेबाजीसाठी अटक केली होती. त्याच्याकडे अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील ग्राहकांचाही समावेश आहे. त्याच्याकडे सापडलेले फोन, लॅपटॉप हे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आल्याचे उपायुक्त अभिषेख त्रिमुखे यांनी सांगितले. त्याच्या चौकशीत सट्टे लावणार्‍या बॉलिवूडमधील अभिनेता अरबाज खानसह आणखी तीन निर्मात्यांची नावे पुढे आली आहेत. त्यापैकी निर्माता पराग संघवी याला पोलिसांनी फोन करून चौकशीलाही बोलावले आहे. सोनूकडे सापडलेल्या डायरीमध्ये काही आयपीएल खेळाडू, निवृत्त खेळाडूंसह बॉलिवुडमधील सट्टा खेळणार्‍यांची नावे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हे प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.

बॉलिवूडमधील काही बडी हस्ती सट्टे लावत असल्याची माहितीही अरबाजच्या चौकशीतून मिळाली असून सरकार चित्रपटाचा निर्माता पराग संघवी याचे नाव पुढे आले आहे. त्यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र तो देशाच्या बाहेर असल्याने 13 जूननंतर तो कधीही चौकशीला येऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. सकाळी 11 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत पोलिसांच्या चौकशीला अरबाज सामोरा गेला. पोलीस उपायुक्त त्रिमुखे यांनी चौकशी केल्यानंतर सायंकाळी चार वाजता अरबाज खानवर कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांना जबाब दिला असून त्यात सर्व म्हणणे मांडल्याचे अरबाज खान याने चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सट्ट्याचे थकीत पैसे वसुल करण्यासाठी बुकी सोनू हा बारबालांचा वापरही करीत असल्याचे समोर आले आहे. त्यांना सट्टेबाजीतील मोठ्या ग्राहकांकडे पाठवून ऑडिओ व व्हिडिओ क्‍लिप्स बनवून ब्लॅकमेल करीत असे. त्याचे फोन रेकॉर्ड करून त्याद्वारे वसुलीचे धंदाही तो करीत होता. सोनू याच्याकडे कोमल नावाची बारबाला असून तिला अडीच कोटी रुपयांचा फ्लॅट घेऊन दिला आहे. तर दुसरा आरोपी कुशल याने काजल नावाची बारबाला ठेवली असून तिलाही फ्लॅट दिलेला आहे. या दोघींना कामाच्या मोबदल्यात दोन टक्के कमिशन दिले जाते. त्यांच्यामुळे काही पोलीस अधिकारीही अडकल्याचे बोलले जाते. हे करण्यामागे सोनूला एका पोलीस अधिकार्‍याकडून मदत केली जात असल्याचे चौकशीत समोर आल्याचे समजते.त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची  शक्यता नाकारता येत आहे.