Wed, Apr 24, 2019 21:53



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पक्षाचा वटवृक्ष करणारेच उन्हात : खडसे

पक्षाचा वटवृक्ष करणारेच उन्हात : खडसे

Published On: Jan 29 2018 1:30AM | Last Updated: Jan 29 2018 1:30AM



मुंबई : विशेष प्रतिनिधी 

पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाणारे आणि पक्षाचा वटवृक्ष करणारेच आज बाहेर उन्हात बसले आहेत, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली. मंत्रीपदी पुनरागमनाची कोणतीही आशा नसल्याने खडसेंनी विरोधाचा सूर अधिक तीव्र केला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कोनशिला प्रसंगी खडसे बोलत होते. त्यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरही उपस्थित होते. आपल्यावर जमीन खरेदीप्रकरणी आरोप करण्यात आले. या आरोपांवर सरकारला कोणते पुरावे मिळाले का याचे उत्तरही आता सरकारने जाहीरपणे जनतेला द्यायला हवे, असेही खडसे म्हणाले. पक्षाच्या वाढीसाठी आयुष्यभर ज्यांनी लाठ्या-काठ्या खाल्ल्या तेच आज बाहेर बसले आहेत, असे खडसे म्हणाले. 

एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे काँग्रेस नेते राजू पाटील यांच्या एकसष्टीच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते. आपल्याला पक्षातून ढकलून बाहेर काढले जात असल्याची व्यथा खडसे यांनी व्यक्त केली होती. मी 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे, पण पक्षानेच जर दूर केले तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.