Wed, Apr 24, 2019 20:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माझ्या मनातले दादांच्या कानात सांगितले : खडसे

माझ्या मनातले दादांच्या कानात सांगितले : खडसे

Published On: Dec 29 2017 1:46AM | Last Updated: Dec 29 2017 10:19AM

बुकमार्क करा
जळगाव : प्रतिनिधी

आपण मंत्रिपदाची वाट पाहत नाही. ज्यांना मोठे केले ते कधीच विसरले आहेत. आपल्याला जे काही सांगायचे आहे, ते अजित पवार यांच्या कानात सांगितले आहे, असे सांगत आपल्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये अशी गुगली माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात टाकली. 

यावेळी आपण भाजपशी बांधील असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या गुणगौरव सोहळ्यात खडसे बोलत होते. 

सत्कारमूर्ती आ. सतीश पाटील यांनी आपल्या भाषणात खडसे यांना त्यांच्या पक्षात न्याय मिळत नसेल तर, आमचे नेते व्हा, अशी गळ  घातली असता आ. खडसे म्हणाले, तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही, मात्र, माझ्या मनात जे आहे ते मी अजित पवार यांच्या कानात सांगितले आहे. काही कार्यक्रम राजकारणाच्या पलीकडे असतात. त्यामुळे याचा चुकीचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये. भावी मुख्यमंत्री अजित पवार होतील अशी अपेक्षा व्यक्त आहे. मात्र, ते जाहीर बोलण्यामुळे अजून चौकशी लागून जाईल, असा टोलाही खडसे यांनी लगावला.

..तर अनेकांची झोप उडेल
 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. खडसे यांच्या वक्तव्याचा सूर पकडत खडसे यांनी माझ्या कानात काय सांगितले हे जर मी जाहीर केले तर अनेकांची झोप उडेल, असे म्हणाले. तसेच, राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असे सांगत, राधेश्याम मोपलवार यांची चौकशी होऊन ते पुन्हा रूजू झाले. मात्र, खडसेंची कोणती चौकशी सुरू आहे हे कळत नाही, असा टोला लगावला.