Thu, May 23, 2019 04:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खडसेंनी काढले आरोग्यसेवेचे वाभाडे

खडसेंनी काढले आरोग्यसेवेचे वाभाडे

Published On: Mar 21 2018 2:19AM | Last Updated: Mar 21 2018 2:06AMमुंबई : खास प्रतिनिधी

गावाकडे लाखा-लाखाची आरोग्य शिबिरे घेऊन उपचारासाठी मुंबईला जायला सांगायचे, पण मुंबईतल्या रुग्णालयात मात्र सुविधाच उपलब्ध नाहीत, असे आजिबात चालणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढले. त्यांचा रोख जिल्ह्यातले प्रतिस्पर्धी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होता. 

आरोग्य विभागाच्या मागण्यांवरील चर्चेत खडसे बोलत होते. जिल्हा ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरचीच नेमणूक होत नाही,आणि झाली, तर तो टिकत नाही. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची सोय नसल्याने तेथे लोकांची गैरसोय होत असल्याची वेदना खडसे यांनी मांडली. डॉक्टरच नसेल तर रुग्णालय तरी कशाला सुरू ठेवता? म्हणूनच सहा महिन्यांपूर्वी या  रुग्णालयाला समारंभपूर्वक टाळे ठोकण्यासाठी आपण यावे असे पत्र आरोग्य मंत्र्यांना देऊन देखील अजून डॉक्टरची नेमणूक झालेली नाही, असे खडसे म्हणाले. 

खडसे यांच्या सरबत्तीनंतर जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण खात्याकडे ट्रान्स्फर केले असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. तेव्हा आता माझी पण कुठे तरी ट्रान्स्फर करून टाका, अशा शब्दात खडसेंनी सरकारलाच चिमटा काढला. पक्षाला घरचा आहेर देण्याची खडसेंची खास स्टाईल आहे. त्यानुसारच त्यांनी आज फटकेबाजी केली. आपण अनेक पेशंट मुंबईला जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवले, पण तेथे आवश्यक त्या सुविधा तसेच व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने पेशंटला प्राण गमवावे लागले, असे खडसे म्हणाले. जे. जे. रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. आरोग्य सेवा द्यायची नसेल तर हॉस्पिटलला कुलूप ठोका. लाखा-लाखांची आरोग्य शिबिरे घायची आणि उपचारासाठी या मुंबईला असे करून चालत नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी  वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना टोला मारला. महाजन यांनी त्यांच्या मतदारसंघात घेतलेल्या विक्रमी आरोग्य शिबिरांचा संदर्भ खडसेंच्या या टोमण्याला होता. 

जिल्हा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जनता त्रस्त आहे. नातेवाईक जेव्हा एखाद्याचा मृतदेह आमदारांच्या दारावर आणून ठेवतात, तेव्हा आम्ही काय करायचं? असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला.

डॉक्टर नाहीत, टेक्निशियन नाही, मग नर्सेसला पगार कशाला द्यायचा? असा सवाल खडसेंनी विचारला. जळगाव मेडिकल कॉलेजला एक रुपयाची तरतूद नाही. गेल्या चार दिवसात झालेले दोन मृत्यू डॉक्टरांच्या अभावी झाल्याचा दावाही खडसेंनी केला.