Thu, Apr 25, 2019 11:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोहरम मे बचेंगे तो ईद मे नाचेंगे: काँग्रेस

मोहरम मे बचेंगे तो ईद मे नाचेंगे: काँग्रेस

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 7:32AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र जिंकला तर आपण दिल्ली जिंकू शकतो, असा विश्‍वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आहे. महाराष्ट्र जिंकायचा तर मतभेद विसरून कामाला लागा; मी तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे, असे सांगत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नेते व कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. 

मल्लिकार्जुन खर्गे दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रदेश पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये करण्यात आले होते. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर आदी यावेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या प्रोजेक्ट शक्तीचे उद्घाटन खर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या देशाची घटना आणि लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस विचारधारा मानणार्‍या सर्वांनी एकजूट करण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीनंतर कुणी मुख्यमंत्री, मंत्री होईल, कुणाला महामंडळाचे अध्यक्षपद मिळेल. काहीच मिळाल नाही तरी आपण सुरक्षित राहू हा विचार करून येथून पुढे पक्षाचे काम करा, असे खर्गे म्हणाले. काँग्रेस पक्षाने या देशाची घटना आणि लोकशाही शाबूत ठेवली म्हणून एक चाय विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकली, असा टोला खर्गे यांनी भाजपा नेत्यांना लगावला. मोदी बुलेट ट्रेनमधून सर्वात जास्त अपराधी घेऊन येणार आहेत. काँग्रेसला पारिवारीक पार्टी म्हणणार्‍यांना स्वत:चा परिवार तरी आहे का? असे
ते म्हणाले. 

देशात फक्त मी आणि मीपणा सुरू आहे. केंद्रातील मंत्र्यांना अधिकार नाहीत. राज्य सरकार बोलण्यात ऑनलाईन कामात ऑफलाईन आहे. मतांसाठी देशात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा करीत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. 

मोहरम मे बचेंगे तो ईद मे नाचेंगे- खर्गे

भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाआघाडी करून निवडणुका लढविताना पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल हे आताच कसे सांगणार. मोहरम मे बचेंगे तो बकरी इद मे नाचेंगे, असे म्हणत खर्गे यांनी निवडणुकीनंतर सर्वसहमतीने पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविण्यात येईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.