Sun, May 26, 2019 00:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिमणीला राज्यपक्ष्याचा दर्जा देणार

चिमणीला राज्यपक्ष्याचा दर्जा देणार

Published On: Feb 25 2018 1:42AM | Last Updated: Feb 25 2018 1:41AMमुंबई :  प्रतिनिधी 

चिमणीला राज्याचा राज्यपक्षी म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्‍वासन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच स्पॅरोज शेल्टरच्या सदस्यांना दिले. पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी संस्थेमार्फत करण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमांचे त्यांनी कौतुक केले. चिमण्यांचे संरक्षण व्हावे व त्यांची संख्या वाढवण्यासाठी स्पॅरोज शेल्टर  या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून वनमंत्री मुुनगंटीवार यांना चिमणीचे कृत्रिम घरटे भेट देण्यात आले. हे घरटे शासकीय निवासस्थानी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

मुंबई, चैन्नई, कोलकाता अशा विविध महानगरांमध्ये व राज्याच्या विविध शहरांमध्ये विकासाच्या नावावर वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असून त्यामुळे चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी अनुकूल जागा उपलब्ध होत नाही. बेसुमार वाढत असलेली क्राँकिटची जंगले, मोठमोठे टॉवर, वृक्षतोड या सर्वांमुळे चिमण्यांचे जीवन धोक्यात आल्याने शहरांमध्ये मोठमोठ्या इमारतींच्या खिडक्यांमध्ये त्यांच्या राहण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी स्पॅरोज शेल्टरतर्फे विविध मान्यवरांना कृत्रिम घरटे भेट दिले जाते.  संस्थेतर्फे आजपर्यंत दीड लाखपेक्षा जास्त कृत्रिम घरटी लावण्यात आल्याचा दावा संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केला आहे. 

चिमण्यांसाठी प्रयत्न

 मुंबई महानगर विभागात प्रचंड मोठ्याप्रमाणात वृक्षतोड होत असल्याने चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. 

 संख्या वाढावी यासाठी राज्याच्या वनविभागाने मुंबई, ठाणे, पुणे आणि अलिबाग या ठिकाणी कृत्रिम घरटी वितरीत करण्याचे ठरवले आहे. 

 नव्या इमारतींमध्ये ही घरटी बसवण्यात येत आहेत. 

 2017 मध्ये अशी एक हजार घरटी ठाणे, कल्याण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन येथे बसवण्यात आली. 

 यावर्षी वसई, शहापूर, गोरेगाव, उल्हासनगर, अंबरनाथ या भागात अशी घरटी वितरीत केली जाणार आहेत.