Thu, Apr 25, 2019 22:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › झाडे तोडणार्‍यांपेक्षा लावणार्‍यांची संख्या वाढवा : मुनगंटीवार

झाडे तोडणार्‍यांपेक्षा लावणार्‍यांची संख्या वाढवा : मुनगंटीवार

Published On: Aug 01 2018 1:31AM | Last Updated: Aug 01 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी 

वृक्ष लागवड हा आता केवळ सरकारचा उपक्रम न राहता ती लोकचळवळ बनली आहे. वनसत्याग्रहाच्या या चळवळीत जनतेने दिलेल्या योगदानामुळे 13 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्णत्वास गेला आहे. पुढील वर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून ते पूर्ण करण्यासाठी झाडे तोडणार्‍या हातांपेक्षा झाडे लावणार्‍यांची संख्या वाढविणार्‍यावर भर द्या, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. 

राज्यात वृक्ष लागवड ही एक लोकचळवळ होत आहे. त्यामुळेच पहिल्या वर्षी 2 कोटी चा संकल्प 2 कोटी 82 लाख वृक्ष लावून तर 4 कोटीचा संकल्प 5 कोटी 43 लाख वृक्ष लावून पूर्णत्वाला गेला. तर यावर्षी 13 कोटींचा संकल्प असताना 14 कोटी 72 लाख वृक्ष लागड करण्यात आली. राज्यात आतापर्यंत झालेल्या दोन्ही वृक्षलागवडीची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्डने घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून त्याचे कौतुक केले. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्याचे वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादन 273 चौ.कि.मी ने वाढल्याचे मुनगंटीवार म्हणाले. 

वृक्ष लागवड, जतन व  संवर्धनासाठी उपलब्ध वित्तीय तरतुदीच्या अर्धा टक्का निधी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. आमदार निधीतील 25 लाखांपर्यंतची रक्कम वृक्षलागवड, संवर्धन आणि जनजागृतीसाठी वापरता येणार आहे. केमिकल इत्यादी उदयोगांकडून प्रदूषण होत असते.अशा उदयोगांना पर्यावरण रक्षणात वाटा उचलण्यासाठी ट्री क्रेडिट पॉलिसी तयार करण्यात येत आहे. जर शेतकर्‍यांनी शंभर झाडे लावली असतील तर त्याचे प्रमाणपत्र त्या शेतकर्‍यांना देण्यात येईल.संबंधित उद्योग या शंभर झाडांसाठी निधी देऊन ती झाडे विकत घेऊ शकेल. यामुळे पर्यावरण रक्षणासोबतच शेतकर्‍यांना पैसेही मिळतील. यासंदर्भात एक धोरण तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  

प्रत्येक जिल्ह्याचा डीपी प्रमाणे टीपी तयार करणार

प्रत्येक जिल्हाच्या डीपीप्रमाणे टीपी अर्थात ट्री कव्हरेज प्लान तयार करण्यात येणार आहे. नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील मोकळ्या जागा, लोकसंख्या, प्रदूषणाचे प्रमाण आदींचा विचार करून हा आराखडा टीपी आराखडा तयार करायचा आहे.वृक्षांच्या विशिष्ट अशा 156 प्रजातींची माहिती असणारे पुस्तक वनविभागाने तयार केले आहे.महापालिकेच्या आवश्यकतेनुसार यातील झाडे लावायची आहेत. मुंबईसारख्या शहरात मोकळी जागा जास्त नाही. मात्र ठाणे,पुणे,पिंपरी-चिंचवडसारख्या महापालिका याबाबत भरीव काम करू शकतात, असे त्यांनी सांगितले.