होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आधारवाडी डम्पिंगवर जबरदस्तीचा कचरा

आधारवाडी डम्पिंगवर जबरदस्तीचा कचरा

Published On: Mar 12 2018 1:24AM | Last Updated: Mar 12 2018 1:01AMकल्याण : सतीश तांबे

देशभरात सर्वत्र कचरा विल्हेवाटीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यातच औरंगाबाद शहरात पेटत असलेल्या कचराप्रश्‍नावरून ही समस्या भविष्यात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. कल्याण-डोंबिवली शहरातही डम्पिंगची समस्या गंभीर असून, येथील एकमेव आधारवाडी डम्पिंगची कचरा साठवण क्षमता केव्हाच संपली आहे. या डम्पिंग ग्राऊंडमध्ये जमा केल्या जाणार्‍या कचर्‍यावर कोणतीच शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात नसल्याने कचर्‍याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

पालिका क्षेत्रात दररोज तयार होणारा 600 टन कचरा मोठ्या 60 आणि छोट्या 100 घंटागाड्या आणि 15 डम्परच्या मदतीने गोळा केला जातो. सकाळी अनेक भागातील कचराकुंड्या कचर्‍याने भरून वाहत असल्यामुळे रात्रपाळीत कचरा उचलण्याचे काम ठेकेदारामार्फत केले जाते. सकाळी आणि रात्री घंटागाड्याच्या मदतीने हा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सोसायट्यांमधील नागरिक ओला आणि सुका कचरा वेगळा करून देत असले तरी महापालिकेकडे या कचर्‍याची विल्हेवाट स्वतंत्रपणे लावण्याची सोय नसल्यामुळे पालिकेचे कर्मचारी हा कचरा पुन्हा एकत्र करून डम्पिंग ग्राऊंडवर फेकतात. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे वर्ग-4 चे 2100 कर्मचारी असून यातील 400 कर्मचारी कचरा उचलण्याचे तर इतर कर्मचारी कचरा संकलन करण्याचे काम करतात. मात्र मुकादमांना हाताशी धरून कामचुकारपणा करण्याकडे या कर्मचार्‍यांचा कल असल्यामुळे अनेक भागातील कचरा संकलन होत नाही. अस्वच्छ शहराच्या यादीत कल्याण-डोंबिवली शहराचा प्रथम क्रमांक आल्यानंतर पालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

सध्या शहरातील कचर्‍यापासून नागरिकांची सुटका झाली असली तरी कचर्‍यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प मार्गी लागत नाहीत तोपर्यत कचर्‍याच्या समस्येतून नागरिकांची सुटका होऊ शकणार नाही. कचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी बारावे, मांडा आणि टिटवाळा या ठिकाणी प्रकल्प तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी स्थानिक नागरिकांकडून होणारा विरोध आणि या कामासाठी न मिळणारे ठेकेदार यामुळे काम रखडले आहे. हे प्रकल्प मार्गी लागल्यानंतरच आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करणे शक्य होणार आहे.

बांधकाम परवानग्या वर्षभर रोखल्या

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज 600 टन कचरा गोळा होत असून हा कचरा आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवरच टाकला जात आहे. डम्पिंगची क्षमता केव्हाच संपली असताना आजही या डम्पिंगवर अतिरिक्त कचरा जमा केला जात असल्याने कचर्‍याचे डोंगरच्या डोंगर उभे राहिले आहेत. या डम्पिंगची क्षमता संपल्यामुळे 2007  पासून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत असून, याप्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पालिका क्षेत्रातील बांधकाम परवानग्या वर्षभर रोखल्या होत्या. यानंतर कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे सत्यप्रतिज्ञापत्र सादर करत पालिका प्रशासनाने तात्पुरता दिलासा मिळवला होता.